![]() |
परंपरेच्या नांगराने आमची लुसलुशीत
जमिन खणून त्यांनी विध्वंसाचे सुरंग पेरले
सातासमुद्रापल्याडून येऊन घरभेद्यांनी
इसवी सनापूर्वीच रक्तलांच्छित स्फोट केले.
गावकुसाचे हे बांडगूळ वर्णाश्रमाचे निर्माते झाले
आमच्या आयुष्याच्या चिंधड्या वेशीवर टांगून
शतकानुतके छळत राहिले.
वारेमाप साधनांना हिरावून
यांनी आम्हालाच गुलाम केले.
शतकांचा अंधार फोडून सूर्यकुळाचा उदय झाला
अंधारलेल्या क्षितिजांच्या
नसानसांतून प्रकाशाचे रक्त वाहिले
अज्ञानाचा रक्तपिळ सोडवून शरीरभर सळसळल्या
तेव्हा, त्यांच्या नांगराचा फाळ वाकून बेकाम झाला.
कैवल्यवाद, साक्षात्कार,
विवर्त, जन्म-मरणाचे फेरे सुटले
प्रत्युत्य-समुत्पादाचे जणू वादळच उठले.
यांचा काळा कृष्ण अन भू रामाचे बिंग फुटले
तेव्हा `तत्त्वमसि' लाही आदर्शवादातच गुंफले
तेव्हापासून...
यांचे डोके हागणदारीच्या पांदणीला टांगले
यांच्या गीतेला दरवेळी नवे चमत्कारिक अर्थ फुटले
कधी शंकराचार्य, कधी ज्ञानोबा तर कधी टिळक
यांचे `सन्यास, चिद्विलास की कर्म'
एकाचे उत्तर एका न ये!
यांचे लबाड लचके थंडगार गोळ्यांनी सहन केले
यांचे अगणित वदतोव्याघात आम्ही पोटी घातले.
तेव्हा विज्ञानवादी बुध्दही यांनी अवतारी केला
यांच्या प्रक्षिप्त विधानांची माय कोणत्या योनिची रे!
युगे लोटली सूर्यकूलाचा जनाधार लोपला
तसा यांचा रोमन क्रिडा पुन्हा वळवळला
योगसूत्राचे प्रक्षिप्त बाळकडू आमच्या गळी उतरविले
बुध्दाचे तत्त्व चौर्यप्रदाने यांनीच मिरविले.
अरण्यवासींच्या हालांचे हेच शिलेदार होत
कवनांच्या कवटीत गुंफुन त्यांचे उदात्तिकरण केले
कधी कालीया नाग, कधी पुतना, एकलव्य मारीले
आणि मूलनिवाश्यांचे हे बांडगूळं भू-देव झाले
या भूमीत बुध्दाच्या धम्माचे तत्त्व कणाकणात मुरले
मातीचा वसा तुटणार तरी कसा
त्यांच्या नागार्जूनाने इथे महायान- हीनयान...
बोधिसत्त्व अन् जातकांचे हळुवार विष पेरले
त्यांच्या कफल्लक शुंग घराण्याने वामाचार केला
महाबलाधिकृत अशोकाच्या
साम्राज्यालाच तडा दिला
पुष्यमित्राकरवी बृहद्रथ सम्राटाचाही घात केला
भिक्खुंच्या शिरकाणाचा अमानुष खेळ केला
तरीही परधार्जिन्यांनो!
आमच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा बाणा आहे
बुध्दाच्या अनुशासनाच्या रंध्रारंध्रात खुणा आहे
विज्ञानाची परम पातळी तपासण्याची मुभा आहे
तुमच्यासह मुक्या पाण्यांनाही
जगविण्याचा मनसुबा आहे
म्हणूनच...
एकविसाव्या शतकाची सूर्यकुलाची सोनेरी पहाट
ब्राह्मण्याला हादरवणारी, माणूसकी जागवणारी आहे
`बहुजन हिताय, बहुजन सुखाय्'
म्हणत पेटवणारी आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचं तुमचं प्राक्तन आहे
------"ग्लासनोस्त" काव्यसंग्रहातून. . .
- पद्माकर तामगाडगे
Comments
Post a Comment