माझी अनवट वाट. . .
- डॉ. पद्माकर तामगाडगे, मुंबई
"खेळलो खेळ असा की मी इथे दमलोच नाही
मी इथे आलो कसा हे मला कळलेच नाही."
मी इथे आलो कसा हे मला कळलेच नाही."
आजचा वर्तमान, या क्षणाला मुठीत घेऊन लिहितो तो क्षण, मी ज्या पथावर आहे ; त्या यशस्वी क्षणाचा साक्षीदार हा माझा भूतकाळ आहे हे मला विसरून चालणार नाही. मी आज आयुष्याच्या यशस्वी वळणावर आहे आणखी खूप करायचे आहे. आयुष्य इतकं छोट आहे की आयुष्याच्या उत्तरार्धातही अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. आपण अतिशय ग्रामीण क्षेत्रातून, सोयी-सुविधांच्या अभावातून, स्वत;चा मार्ग क्रमीत वाटचाल करीत असतो आणि या तुटपुंज्या साधन-सामुग्रीच्या सहाय्याने जो इच्छित धेय्य गाठतो तोच खरा यशवंत. माझा वर्तमान शिक्षणाने प्रकाशित केला. आज शिक्षणातील सर्वोच पदवी पीएच. डी. मिळवून ख-या अर्थाने राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आलो आहे. जागतिक शैक्षणिक संदर्भातील 'पीपल्स एजुकेशन सोसायटी' च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'सिद्धार्थ महाविद्यालयात' मराठी विभाग प्रमुख म्हणून गेली सहा वर्ष कार्यरत आहे. की ज्या स्थानी मोठ मोठी साहित्यिक व नावाजलेल्या व्यक्ती कार्यरत होत्या. त्यात अनंत काणेकर, सचिन तेंडुलकरांचे वडील रमेश तेंडूलकर इ. ही जबाबदारी मला मिळाली त्याचे सिंहावलोकन करून मागे पाहणे व माझ्या इथपर्यंतच्या प्रवासाचे अमूल्य क्षण स्मरण करणे या प्रसंगी उचितच ठरेल आणि माझ्या मागच्या येणा-या काफिल्याला ते मार्गदर्शक ठरावे हाच माझा नम्र हेतू आहे.
शिक्षणाच्या व्याख्या अनेकांनी केल्या; अब्राहम लिंकन यांचे पत्र अनेकांना प्रेरणादायी ठरते. मात्र साध:स्थितीत शिक्षण म्हणजे नौकरी हे समीकरण झाले आहे. शिक्षणाचा हेतू महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काय होता? "शिक्षण म्हणजे नैतिक मूल्यांची शिकवण", "Development of character or mental power " एका आदर्श व्यक्तिमत्वाची जडण-घडण ज्या शिक्षणातून मिळते ते खरे शिक्षण. भारताला एक संस्कृती आहे त्या संस्कृतीने जगातील शिक्षणाचे संदर्भ दिले आहे. युरोप असो व अथेन्स असो. आज ज्यांची तत्वज्ञ म्हणून नाव घेतो त्यांनी भारतातील 'नालंदा', 'तक्षशीला' या विद्यापीठातून नवे तात्विक मूल्य आत्मसात केले आहे. इ.स. च्या ४ त्या ५ व्या शतकात जगातील अनेक विद्वान भारतात उच्च शिक्षणासाठी या विद्यापीठात वास्तव्याला असायचे. आज मात्र परिस्थिती उलट झालेली आहे. आज आपणच उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देश्यांमध्ये शिकायला जातो. विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे वाईट आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. मात्र आपल्या जवळचे स्वत: विसरून जातो आणि मृगजळाच्या मागे धावत राहतो हे स्वत:ला फसविणे आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे त्याचे ज्ञान आत्मसात करणे गरजचे आहे. म्हणून स्वसामार्थ्याने जे परिस्थितीला काबूत ठेवून त्यावर मात करायला शिकतो तो यशस्वी होतो नियतीला शरण जाणारा पराभूत होतो. मात्र नियतीला आपल्या मनगटाच्या बळावर वाकवून आपल्या इच्छितापर्यंत जो पोहचतो तोच आयुष्याच्या यशोशिखरावर पोहचतो. ओदान्त्पुरा, नालंदा, विक्रमशीला, जगताला, तक्षशीला हे भारतातील विध्यापीठे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्रे होती. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात नालंदा विहारात विशाल ग्रंथालय होते. ताळपत्रे व भोजपत्रे वापरून हे ग्रंठ्लाय सिद्ध केले होते. सुलतानी आक्रमणात २ लाख ग्रंथ ६ महिने जळत राहिले. यावरून तत्कालीन ग्रंथ समृद्धी व विशालता लक्षात येईल. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई येथील निवास स्थानी 'राजगृह'त २२ हजार तर दिल्लीला १५ हजार ग्रंथ होते. हे सांगायचे तात्पर्य एवढेच की भारताला प्राचीन काळापासून ते वर्तमान, समकाल पर्यंत ज्ञानाची मोठी परंपरा आहे. ग्रंथाशी मैत्री केली की खरे-खोटे, नैतिक-अनैतिक कोणते हे ठरविण्याचे चक्षु मिळतात म्हणून वाचन हेच सर्व दु:खाचे निरुपण ठरणारे आहे.
उद्याचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे. आणि आज ग्लोबलायझेशन, खाजगीकरणामुळे ग्रामीण भारत कोलमडून पडत आहे. सध्याचे वर्तमान प्रश्न वेगळे आहे. त्यावर उपायही शोधणे या पिढीचे कर्तव्य आहे. त्यासाठी आधी ते समजून घेणे गरजचे आहे. वर्तमानाशी सांधेजोड जो करणार नाही तो त्या पिढीचा शत्रू ठरतो. म्हणूनच जात, धर्म, स्थळ-कालातीत विचारच मानवी जीवन तारू शकणार आहे.
प्राचीन कालपासूनच धर्माचे राजकारण करण्याची परंपरा या देशात आहे. मगध, जम्बुद्विपा पासून भारत- हिंदुस्थान इथपर्यंतचा इतिहास पाहिल्यास आपणास स्पष्ट दिसून येईल. म्हणून विध्यार्थ्याचे ज्ञानार्जन व राजकारण या एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. शैक्षणिक संकुलात जेव्हा राजकारणाचा शिरकाव होतो तेव्हा विध्यार्थ्यांच्या पिढ्या बरबाद होतात.
"माझ्या येणा-या भविष्या | इतिहासाचे पाने चाळीत ये
नराधमांच्या क्रूर कृत्याचे | मुडदे सुखाने जाळीत ये "
हाच संदेश माझ्या येणा-या भावी पिढ्यांना आहे. जो स्वत:सह अखिल मानवाचे कल्याण चिंतील. तसे कृत्य त्याच्या मनगटातून घडेल. मित्रांनो माझी वहिवाट ही अनवट होती. कदाचित त्यामुळेच मी इथे यशस्वीरीत्या पोहोचलो.
**************************
डॉ. पद्माकर तामगाडगे,
मराठी विभाग प्रमुख,
सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई.
Comments
Post a Comment