|| सृजनवेध ||
महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .
- डॉ. पद्माकर
तामगाडगे
महिला
सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि
त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने
सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता. दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने
जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची
दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने
विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा
महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट
पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे
अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले.
पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध
दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१७ साली महिलांच्या रोटी पासूनच सुरु
झाली. स्पेन मध्ये ८ मार्च १९३७ साली तानाशाही करणारा फेन्को याच्या अत्याचारी
राजवटीला सुरुंग लावण्याचे काम महिलांनीच केले
आणि जगातील जिथे जिथे असे तानाशाही करणारे शासक होते त्यांच्या विरुद्ध बंद
पुकारण्याची धडाडीच या महिलांच्या संघटनाने लावली. या महिला शक्तीचा प्रत्यय
इटलीच्या मुसोलिनी सारख्या करड्या प्रशासकालाही आल्याशिवाय राहिला नाही. १९४३
मध्ये त्याच्या विरुद्ध प्रदर्शन करून जगाला महिलांची शक्ती दाखवून दिली. १९७९
मध्ये इराण मध्ये महिलांच्या संघटीत शक्तीने खौमनी याच्या महिला विरोधी नीतीचा
चांगलाच समाचार घेतला.
महिलांच्या
या चळवळीबरोबरच सिमोन-दि-बोव्हा (Simon de Beauvoir) व्हर्जिनिया वूल्फ (Virginia Woolf) या दोन
विदुशिंचेही योगदान भरीव आहे. दुसऱ्या महायुद्धातील संहारानंतर फिनिक्स पक्षासारखा
राखेतून पुन्हा नव्याने जन्म घेणाऱ्या देशांना महिलांनी आपल्या सशक्त हातांनी
सावरले हा इतिहास आजही साक्ष देत आहे. जगातील पुरुष सत्ताक व खोट्या अविर्भावात
राहणारा पुरुष इथे मात्र गळून पडला होता. तुथे महिलांनीच देश सांभाळले आहे.
महिलांनी घराच्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू रेल्वे-प्लेटफोर्म, माणसांच्या
गर्दींच्या ठिकाणी जाऊन घरे सांभाळली.
सिमोन-दि-बोव्हा (Simon-d-Bouviour) नी तर “The second sex” लिहून पुरुषांच्या
पौरुष्याचे वाभाडेच बाहेर काढले. समाजात महिलांची अबला म्हणून परिस्थिती ही इथल्या
व्यवस्थेनेच केली आहे हे तिचे ठाम मत होते. “One is not born. But rather
become she women.” स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर
तिला समाज स्त्री बनवितो. हे वास्तव भारतातही होते आणि आजमितीला ते आहेच. रशियाचा
लेखक ‘आई’ (Mother) या जगप्रसिद्ध कादंबरीचा लेखक मॅक्झीम
गोर्की यानेही स्त्रियांविषयीची भूमिका जगाला प्रवर्तित करणारी आहे हे दाखवून
दिले. कारण तो माणसांवर प्रेम करणारा संवेदनशील लेखक होता. ‘I know nothing
finer, more complex more interesting than man. He is everything. . .” या जगात माणसांइतकं सुंदर कुणीही नाही, तोच सर्व काही आहे. . . ही वैश्विक
भूमिका जगणं हे मोठ्या प्रतिभावंताचे कार्य आहे. आपल्याकडे हरि नारायण आपटे
यांनीही प्रारंभी आपल्या सामाजिक कादंब-यातून स्त्री उद्धाराचे भावविश्व साकारले.
म्हणूनच कवी केशवसुतांनीही “. . . पण
लक्षात कोण घेतोच्या कर्त्यास” नावाची कविता लिहून ‘स्त्री जातीस काढ असाच वरती,
घे कीर्ती संपादूनी म्हणत स्त्रियांवरील आपली उद्धाराची श्रद्धा नोंदविली आहे.
हे
सगळे विश्लेषण जरी खरे असले तरी स्त्रियांच्या उद्धाराची व तिच्या मानवी हक्काची
लढाईची सुरुवात झाली आणि ती केवळ एका प्रदेशातील स्त्रियांपुरतीच नसून अखिल
विश्वातील स्त्रियांच्या उद्धाराची ठरली, ती म्हणजे महात्मा जोतीबा फुले आणि
सावित्रीबाई फुले यांच्या ‘कृती-उक्ती’ कार्यातून. १ जानेवारी १८४८ ला पहिली
स्त्रियांची शाळा काढून जगातील दु:खितांचे अश्रू पुसण्याचे व स्त्रियांना सक्षम
बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य या फुले दाम्पत्याने केले. मात्र
इथल्या व्यवस्थेने त्यांच्या कार्याचा गवगवा होऊ दिला नाही. आजही तो जगाला कळू
दिला नाही. ही प्रत्येकच भारतीयांची शोकांतिका आहे. की आमची प्रसारमाध्यमे आणि
लेखक अजूनही प्रतिगामी छावणीतच सुस्कारे टाकत आहेत. क्लारा जेटकिनला जर हा वास्तव
पुरावा कळला असता तर ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून गृहीत न धरता ३ जानेवारी
हा सावित्रीबाई फुलेंच्या जन्म दिनच ग्राह्य धरला असता. आणि तोच जागतिक महिला दिन
म्हणून सर्व जगभर साजरा केला गेला असता. स्त्रियांच्या शिक्षणासाठी तहहयात झटणारे
हे फुले दाम्पत्य भारतीयांना लाभले. भारतातील शिक्षणाची पणती लावून त्याचा आज मोठा
ज्ञानाचा प्रकाश घरोघरी पोहचविला तरीही शिक्षक दिन म्हणून शिक्षण क्षेत्रात
पावलीचाही वाटा नसणा-यांच्या नावाने ‘शिक्षक दिन’ देश सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतो ही जाणकार माणसाला क्लेषदाई बाब
ठरते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पठडीत तयार झालेल्या ताराबाई
शिंदे यांनी भारतीय व्यवस्थेतील पुरुषी अहंगंडाचा फुगाच ‘स्त्री-पुरुष तुलना’ या
ग्रंथातून फोडून टाकला. ख्रिश्चन विदुषी मिसेस फेरोर यांनीही ‘कुटुंब प्रवर्तन
नीती’ निबंधातून स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या मूलगामी मागणीची व तिच्या
स्वत्वाची नव्याने ओळख समस्त स्त्रियांना करून दिली यांचे कुठेही नाव मात्र स्वयं
स्त्रियाही घेतांना दिसत नाही. कारण इथल्या व्यवस्थेने त्यांच्या कामगिरीची जाणीवच
होऊ दिली नाही. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होईल असे कोणतेच पाठ शाळा व शिक्षण
संस्थेतून व्यवस्थेने शिकविले नाही. परिणामतः भारतीयांना, महाराष्ट्रीय लोकांना,
स्त्रियांनाच हिथे सावित्रीबाईंचे कार्य आपल्या जीवनासाठी काय ? त्यांचे मोल काय ?
हे माहित नसेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे माहित असेल ? म्हणून वर निर्देश
केल्याप्रमाणे क्लारा जेटकिनला ते माहित होणारी साधने त्या काळात उपलब्ध नव्हते.
क्लारा जेटकिन, सिमोन-दि-बोव्हा (Simon de Beauvoir), व्हर्जिनिया वूल्फ (Virginia Woolf) या स्त्रियांच्या
चळवळ करणाऱ्या विदुषींना भारतात या चळवळी १०० वर्षाआधीच सुरु झाल्या हे माहित असते
तर त्या भारतभूमिशी नतमस्तक झाल्या असत्या.
आज
जगभर महिला सक्षमीकरणाचे वारे वाहत आहेत. ‘एम्पावरमेंट ऑफ वूमेन’ च्या माध्यमातून
महिला सशक्तीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. तरीही एका बाजूला महिला अजूनही शोषणाच्या
गर्तातेत जीवन जगातच आहेत. या मागचे कारण सनातनी प्रभावातून अजूनही समाज पुरता
बाहेर निघाला नाही. परंपरेचे जळमटे अजूनही खांद्यावर वागवण्याची मनीषा अजूनही
भारतियांमध्ये संपलेली नाही. त्यामुळे स्त्रियांना बाह्यात्कारी स्वातंत्र्य दिले
असले तरी पुरुषी मनात अजूनही ती अबला, वामांगी, नारी, कमकुवत, व्यभिचारी असे
नानाविध दुषणे घेऊनच उभी राहते. तिचे मंगळसूत्र हेही एक तिच्या गुलामिचेच प्रतिक
आहे. हे सगळं सांभाळून आज महिला भारतीय
संविधानाच्या ताकतीवर स्वतःचा आत्मविश्वास सांभाळून समाजाच्या रचनात्मक कार्यात
सहभागी होतांना दिसते. स्वस्थ आणि शिक्षणाप्रती ती गंभीर आहे. जागतिक पातळीवर स्त्री-पुरुष समानता १९४५ आणि
१९४८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकृती दिल्यावर प्राप्त झाली. आज जगभर
स्त्रियांना विकासात्मक प्रक्रियेत समान भागीदार म्हणून सहभागी केले जाते. भारतीय
संविधानात स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान संधी दिली पाहिजे यावर भर दिला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला सक्षम कार्यक्रमावर एक नजर टाकली तर असे लक्षात येते
की मेक्सिको मध्ये १९७५, नैरोबी मध्ये १९८५, आणि १९८८ मध्ये राष्ट्रीय
पातळीवर महिलांच्या सहभागासंदर्भात एक
कार्यकारी योजना बनविली आहे. त्यात १९७६ मध्ये राष्ट्रीय शिक्षण योजना, १९८३ ला स्वास्थ्य
योजना, १९९३ मध्ये सकस आहार योजना यांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
आज मानव संसाधन विकास मंत्रालय मार्फत ‘महिला व बाल कल्याण’ विभागसुद्धा स्थापन
करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ७३ व ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार राजकीय सत्तेतही
सहभागी करण्याची संविधानात तरतूद केली गेली आहे. पंचायत व स्थानिक निवडणुकांमध्ये
सुद्धा आरक्षण दिल्या गेले आहे.
असे
असले तरी समाजात महिला कितीही सशक्त देखावा करीत असली तरी घरी मात्र ती ‘पती देवो
भवः’ या न्यायानेच वागतांना दिसते. तिचे सर्वस्व पतीच्याच चरणी आहे. ही खुळचट
कल्पना अजूनही शिक्षित म्हणवणाऱ्या स्त्रियांच्याही मनातून गेलेली दिसत नाही याचाच
फायदा घेऊन उच्च पदस्थ असणाऱ्या महिला नावासाठी पद सांभाळतात बाकी सर्व व्यवहार
हेच पतीदेव करीत असल्याचे दिसून येते. तिचे उदात्तीकरण केले जाते. मग ते देवी
दुर्गा, अन्नपूर्णा, लक्ष्मी, महाकाली, महालक्षमी, सरस्वती व नानाविध देवी-अम्मा
असोत. शोषणाचे मूळ हे आपल्यातच असते.
शोषकांना वेळीच त्याचा प्रतिकार केला की पुन्हा तो आपल्या वाट्याला जाणार नाही
अशीच जरब आधुनिक काळातील महिलांनी बसविली पाहिजे. तरच राष्ट्राच्या उभारणीत समान
हातभार स्त्रियांचाही लागेल. ‘हाथ लगे निर्माण में | नही मांगने नही मारणे’ महिला सशक्तच असतात म्हणून त्या संवेदनशील,
भावनिक असतात. त्या सृजनशील आहे म्हणूनच हा प्रपंच हा भवसागर टिकून आहे. समाजाने
या सृजनालाच कुस्करून टाकले तर कुठे जाणार ? कुणाकडे पाहणार ? हा विचारच केला नाही
म्हणून वेळीच सावध व्हा ?
· · * · ·
Comments
Post a Comment