. . .
येणाऱ्या सळसळत्या भविष्या
-डॉ. पद्माकर
तामगाडगे,
९८६९५८१६४७
जगाने कूस बदलली तो काळ आपणास
सांगता येतो. १९६० नंतर हे जागतिक स्थित्यंतर प्रकर्षाने सर्व स्तरात जाणवायला
लागले. भारतातील सर्वसामान्य माणसांपासून ते नवकोट नारायणांपर्यंत सगळ्याच वर्गीय
पातळ्यांना कमी-अधिक प्रमाणात या झाला जाणवायला लागल्या होत्या. त्या तीक्ष्ण होऊन
आता असह्य व्हायला लागल्या आहेत. म्हणून लोकांची जगभरातील ओरड प्रत्येकाच्या
कानापर्यंत ऐकायला येत आहे. १९६० नंतर औद्योगिक क्रांतीबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि
तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पाऊन सर्वसामान्यांच्या दारात उभे राहिले. जगात
आर्थिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत प्रत्येकच देश सहभागी होऊ लागला आणि वरकरणी
नकार दिसणारा देशही प्रत्येक देशाला स्पर्धकच समजायला लागला. खाऊजा धोरण आले
म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि सातासमुद्रापल्याडच्या सीमा क्षणात
जवळ आल्या हे विश्व आता ग्लोबलकूस झाले. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्दीम, विविध करार
झाले. एकमेकांसाह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत हातात हात घालून आपापला विकास काही
कूर्म गतीने तर काही तीव्र गतीने करत राहिले आणि हा आजचा दिवस उजाडला. मात्र आज
आणि उद्याच्या येणाऱ्या पिढीचे काय ? त्यांच्यापुढे काय मांडून ठेवणार आहोत आपण?
येणाऱ्या सळसळत्या भविष्याचे भविष्य आपणच कडेलोट करणार आहोत काय? येणार काळ
त्यांच्या साठी त्यांचा काल ठरणार आहे काय?. . .
अमेरिका, इंग्लंड, रशिया,
चीन, जपान यासारखी वरकरणी सुखासीन व प्रगत दिसणाऱ्या देशाची व विकसनशील वा अविकसित
देशांची सध्या या वैश्विकारणात एकच स्थिती आहे. देशात असणाऱ्या लोकसंख्येच्या
तुलनेत भूभाग कमी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेकांचे हात रिकामेच झाले आहे.
देशातील गरीब, मध्यमवर्गीय जनता जगण्याच्या स्पर्धेत रोज नामोहरम होत आहे.
भारतातील हे क्षण दररोज आपण अनुभवत आहोत. सरकार गरिबांसाठी रोज नवे संकट उभारत आहे
असे देशातील सत्तेत नसणाऱ्याना वाटत आहे. मग ते देशातील गरीब कोण? हे
ठरविण्यापासून ते साब्सिडीवरील ६ सिलेंडरपर्यंत रोज नवे नवे आव्हान पेलत आहे. इथली जनता दहशतीत जगत आहे. ही गत आजची आहे तर उद्या
काय? उद्याचा प्रश्न कसा असणार आहे. असे म्हटले जाते की देशाची धुरा भावी पिढीवर,
त्यांच्या खांद्यावर असते. आमच्या भावी पिढीचे खांदे खरेच आम्ही मजबूत करीत आहोत
की दुबळे? सत्तेवर जो पक्ष येतो तो आपल्या सत्ते साठी खोटी आमिषे जनतेला दाखवून
भूलवतात. या जगरहाटीत गरीब आणि श्रीमंत दोघेही पिचले जात आहेत आणि शासनकर्तेदेखील.
. . कारण जगानेच आपली असमर्थता दर्शविली आहे.
आईएलओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी येणाऱ्या या
सळसळत्या भविष्याचे भाकीत वर्तविले आहे.
त्यांच्या अहवालानुसार संपूर्ण जगात १५ ते २४ या वयोगटातील ७.५ करोड युवक
बेरोजगार आहेत किंवा त्यांची दिवसाकाठी दोन डॉलर पेक्षा कमी मिळकत आहे. अशा
तरुणांची संख्या श्राम्शाक्तीच्या १३ टक्के आहे. या अहवालामध्ये असेही म्हटले आहे
की या स्थितीशी झगडण्याचे मानसिक त्राण नसल्यामुळे ४० लाख युवकांनी रोजगार
शोधण्याची मिथ्या कसरत सोडून दिली आहे. जगात अनेक युवक बेरोजगारीने त्रस्त आहेत.
त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी देशाने निर्माण केल्या पाहिजे. मात्र जागतिक
पातळीवर आर्थिक मंदी सुरु असल्यामुळे अनेक सशक्त कंपन्याही भूईस माथा टेकवीत
असल्याचे रोजच्या बातम्यांमध्ये आपण पाहतोच आहोत. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने
जगातील या उद्योगपतींना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास प्रयत्न करण्याचे
निर्देश दिले आहेत. आपापल्या क्षेत्रात ही तरुण पिढी वाकबगार आहे. मात्र त्यांच्या
क्षमतांचा विनियोग कुठे आणि कसा करावा याचे नियोजन ना तो देश करू शकत आहे ; ना
स्वयं तो युवक करू शकत आहे. त्यामुळे तकलादू स्थितीत तो अंशकालीन म्हणून कुठे तरी
श्रम करत आहे. ही स्थिती प्रत्येक क्षेत्रात आपणास दिसते. २००७ नंतर ही बेरोजगारी
सतत वाढतच आहे. २००९ मध्ये बेरोजगारीची अत्यंत बिकट स्थिती होती. सध्या ही स्थिती
अल्पशी सुधारली असली तरी या अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे २०१६ पर्यंत
जगभरातल्या बेरोजगारीला नियंत्रित करणे शक्य होणार नाही असे सुतोवाच केले आहे. या
अहवालामध्ये सांगितल्याप्रमाणे युरोपमध्ये दर पाच तरुणांपैकी एक तरुण हा बेरोजगार
आहे. उत्तरी आफ्रिका मध्ये २७.९ टक्के युवक बेरोजगार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत
ही वाढ ५ टक्क्याने अधिक आहे. पूर्व-मध्य देशांमध्ये ही स्थिती २६.५ टक्के आहे.
पूर्व आशिया मध्ये प्रौढांच्या तुलनेत २.८ टक्के अधिक आहे. दक्षिण आशियामध्ये २००७
च्या तुलनेत बेरोजगारीत वाढ होऊन येणाऱ्या काळात ही स्थिती अत्यंत घटक ठरणार आहे.
या अहवालात आणखी एक कारण सांगितले ते कितपत समर्पक आहे याचा ठाव घेता येईल. त्यात
ते म्हणतात जगातील तमाम तरुण पिढी उच्च शिक्षण यासाठी घेत आहे कारण त्यांना रोजगार
उपलब्ध नाही. जगातील ६० लाख तरुण रोजगार न मिळाल्यामुळे समाजापासून दुरावले गेले
आहेत. कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा वापर समाजासाठी त्यांना करता येत
नाही आहे. सध्यातरी या महागर्तातेत सापडलेल्या तरुण पिढीला रोजगाराच्या संध्या
देणे महासत्ता असणाऱ्या देशानाही संभाव नाही आहे. येणारा काळ हा असा आहे.
आर्थिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतही सध्या हीच
स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी टॅक्स मध्ये कपात आणि
रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी एक विशाल योजना बनविली आहे. त्यात ४४७ अरब डॉलर खर्च
होणार आहे. मात्र ओबामा सरकारला खुद्द या योजनेमुळे काही लाभ होईल अशी खात्री वाटत
नाही. भारतात अशा योजना भ्रष्ट राजकारण्यांच्या खिशात जातात. मेलेल्याला आणखी
मारण्यात व टाळूवरचे लोणी खाण्यात भारतीय भ्रष्ट राजकारणी आघाडीवर आहेत. तरुणांच्या
हाताला काम दिले नाही तर ‘रिकामे डोके भूताचे घर’ म्हणतात त्याप्रमाणे ही तरुण
पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आपसूकच वाहवत जाईल. तरुणांच्या मनगटातील प्रचंड
उर्जेचा वापर विधायक कामात झाला तर जगाचे कल्याण होईल. मात्र हेच हात प्रचंड
उर्जेने विघातक कृत्याकडे वळले तर विनाश अटळ आहे. भारतात इतर देशांच्या तुलनेत
प्रचंड बेरोजगारी आहे. त्यामुळेच खेड्या-पाड्यावरील तरुण व्यसनाधीन होत चालला आहे.
शिकलेला मुलगा पारंपरिक व्यवसाय वा शेती करण्यास तयार नाही. चार बुके शिकालेल्याला
ही हीन दर्जाची कामे वाटतात आणि त्यांच्या पदव्या त्यांना रोजगार उपलब्ध करून
देण्यास असमर्थ आहे. त्यामुळे पैशाची ऐपत असणारे लाच देऊन, डोनेशन देऊन नोकऱ्या
हस्तगत करतात. ज्यांच्या जवळ पैश्याची ऐपत नाही ते सरकार दरबारी, ठिकठिकाणी चपला
झिजवतात आणि नैराश्यापोटी व आलेल्या भ्रष्ट व्यवस्थेपोटी काही आत्महत्येस प्रवृत्त
होतात तर काही नक्षलवादाकडे वळतात. या सबंध रहाटीत जगाचा-देशाचा पोशिंदा शेतकरी कुठे
आहे? तर त्याला बी-बियाणे, खत, शेतकी औजारे यांच्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागते.
सुगी आली की त्याला क्षणिक आनंद होतो. मात्र क्षणात पुन्हा त्याच दुष्टचक्रात जाऊन
पडतो कारण आलेले धान्य बेभाव दलाल-अडत्यांना देऊन त्यांना आपले कर्ज फेडायचे असते.
ते देऊनही ते फिटत नाही. तेव्हा येणाऱ्या वर्षासाठी बेगमी कुठून करणार.
सर्वसामान्यांना तर श्वास घेणेही दुरापास्त होत आहे. महागाईने उच्चांक गाठला.
दैनंदिन गरजाही पुरेशा भागविणे कठीण होत आहे.
अशा स्थितीत देशाने काय पाऊले उचलायला पाहिजे? तर लहान-लहान
कुटीर उद्योगांना आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबी केले पाहिजे. शेती
व्यवसायाला हीन न समजता युवापिढीने आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून भरघोस उत्पादन
घेतले पाहिजे. बँकांची स्थिती सुधारण्यासाठी शेयर भागधारकांकडून पैसा उभारला
पाहिजे. बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण, शिक्षण आणि नौकरी निश्चित केली
पाहिजे. श्रमाचे विभाजन करून कार्यक्षम असणाऱ्या हातांना क्षमतांचा उचित वापर केला
पाहिजे. आर्थिक विषमतेची दरी कमी केली पाहिजे. बाह्य देशांच्या भरोशावर आर्थिक
स्वावलंबनाचे दिवास्वप्न न बघता आपले आपण स्वयंपूर्ण कसे होऊ शकतो याचा
सूक्ष्मरीत्या अभ्यास करून. अबालवृधांपर्यंत निर्मितीचा हातभार कसा लागेल याच्या
योजना आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. देश्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा,
भौगोलिक पर्यावरणाचा अभ्यासपूर्ण विनीयोग करून स्वावलंबी झाले पाहिजे. व्यावसायिक,
व्यावहारिक शैक्षणिक योजना आखून शिक्षणाचा आराखडा योजून शिक्षण व उत्पादन क्षमता
यांचा सहसंबंध प्रस्थापित केला पाहिजे.
असे केले नाही तर इतर मुजोर देश दुर्बल पण नैसर्गिक सधन
असणाऱ्या देशावर आर्थिक गुलामगिरी लादून देश लुटून नेईल आणि आपण फक्त बघण्यावाचून
काही करू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने दिलेल्या सूचनेला दुर्लक्षून
चालणार नाही २०१६ पर्यंत अंध:कराच आहे. म्हणून देशाचे पहिले मजूर मंत्री, भारतीय
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘Do not depend upon God or Superman’, ‘Do not believe in
fate, Believe in your strength’ हे तत्व तेव्हापासूनच जगाने पाळले
असते तर ‘लाथ मारू तिथे पाणी काढू’ म्हणण्याची क्षमता इथल्या तरुण पिढीत आज असती.
माझ्या येणाऱ्या सळसळत्या भविष्या वेध घे ! सृजन तुझ्या मनगटातील विधायक क्षमतेवर अवलंबून आहे.
· · * · ·
Comments
Post a Comment