“Education is not preparation for life: education is life itself.”
John Dewey
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत.
महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाही. आपल्या समाज बांधवांचे दु:ख पाहून अवघ्या ६५ वर्षाच्या हयातीत पिढ्यानपिढ्याचे दु:ख निराकरण करून गेलेत. येणाऱ्या समस्यांचे अनेक मार्ग त्यांनी निर्माण करून ठेवलेत.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाबासाहेबांना महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने दरमहा २५ रुपये प्रमाणे बदल्यात बडोदे संस्थानाची नोकरी करण्याच्या अटीवर शिष्यवृत्तीची मदत मिळाली. शिक्षणासाठी, ज्ञानासाठी जगात असा करार कुणीही केला नसेल. या घटनेचा उल्लेख एवढ्याचसाठी की बाबासाहेबांची आर्थिक स्थिती कशी होती याचा वाचकांना अंदाज यावा म्हणून. अशा प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांचे शिक्षण सुरु होते. पुढे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किमान घरखर्च निघावा यासाठी त्यांनी १० नोव्हेंबर १९१८ ला सिडनहॅम महाविद्यालयात हंगामी प्राध्यापक म्हणून ते नोकरीत रुजू झाले. त्यासाठी दरमहा त्यांना ४५० रुपये मिळत असे. याच काळात त्यांनी अनेक सामाजोपक्रम सुरु केलेत. शिवाय परदेशी शिक्षणासाठी येणारा खर्च, शाहू महाराजांनी केलेली आर्थिक आणि मानसिक मदत. यामुळे ते ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पोलिटिकल सायन्स’ येथील एम.एस्सची पदवी घेऊ शकले. त्याचबरोबर ‘ग्रेज इन’ या संस्थेतून बॅरिस्टरची पदवीही मिळविली. १९२३ साली बाबासाहेब भारतात परतले. ५ जुलै १९२३ पासून मुंबई उच्च न्यायालयात बाबासाहेबांनी वकिली सुरु केली. डॉ बाबासाहेबांचा हा खऱ्या अर्थाने अर्थार्जनाचा प्रारंभ म्हणता येईल. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत माता रमाई आपल्या संसाराचा गाडा हाकत होतीच. त्यात आलेला बहुतांश पैसा घरखर्चापेक्षा पुस्तके खरेदीसाठी केल्या जायचा. पण साहेबांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुस्तकांसाठी माता रमाईने कुठलीच कुरबुर कधी केली नाही. म्हणूनच या रमाईच्या त्यागाचे फलित म्हणून ‘राजगृह’ समस्त आंबेडकरी जनतेचे एक निष्ठावान अस्मितेचे स्मारक दिमाखात समाजाला प्रेरणा देत आहेत; नव्हे समस्त भारतीयांना प्रेरणा देत आहे. ते मानवतेचे, समतेचे, त्यागाचे, ज्ञानाचे प्रतीक आहे. जगात एकमेव उदाहरण ठरलेले हे राजगृह केवळ दगड-विटांचे नसून भावनांच्या ओलाव्यांनी बांधलेले घर आहे. नुसतेच घर नसून ते ग्रंथघर, ज्ञानाचे घर आहे. म्हणूनच आचार्य अत्रे म्हणाले होते, ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झाला असेल त्यांनी राजगृहात क्षणभर जाऊन बघावे; त्याचे गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी जागतिक अस्मित्तेची वास्तू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथांसाठी उभारली होती.
राजगृह :
डॉ. बाबासाहेबांचा हा प्रवास याच साठी निर्देशित केलाय की त्यांची आर्थिक स्थिती वाचकांना लक्षात यावी. जरी ती सर्वश्रुत असली तरी मुंबईसारख्या इलाख्यात एका उच्चभृंच्या वस्तीत महार जातीच्या नागवल्या गेलेल्या व्यक्तीचे स्वतःचे घर असणे ही म्हणावी तेवढी साधी गोष्ट नव्हती; ती एक ऐतिहासिक घटनाच होती. या घरासाठी बाबासाहेबांनी काय खस्ता खाल्ल्या त्याचा संक्षिप्त इतिहास आपण जाणून घेऊयात.
डॉ. बाबासाहेबांच्या वकिलीचा व्यवसाय भरभराटीला आला होता. अल्पावधीतच त्यांची एक निष्णात वकील म्हणून ओळख सर्वदूर पसरली होती. त्यातही अर्ध्या-अधिक केसेस ते समाजसेवा म्हणूनच विनामूल्य लढत. त्यामुळे हाताशी येणारा पैसा फार जमापुंजी रूपाने उरत नसे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लेखन करणारे चांगदेव खैरमोडे आपल्या ग्रंथात ‘राजगृहा’च्या पायाभरणीच्या या घटनेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यांनी लिहून ठेवलेल्या दस्तावेजाप्रमाणे व मुंबई इमप्रूव्हमेंट ट्रस्टच्या दस्तावेजाप्रमाणे राजगृहाचा संक्षिप्त इतिहास पाहूयात. ते म्हणतात – ‘१९३० च्या अखेरपर्यंत डॉ. बाबासाहेबांची सांपत्तिक स्थिती बरी झाली.’ बरी झाली म्हणजे अफाट श्रीमंती नव्हे तर जगण्यापुरती व काही बचत होऊ शकेल इतपत सुधारली होती. कारण १९२० ते १९३० या दहा वर्षात बाबासाहेबांच्या एकूण सामाजिक चळवळीचा झंझावात पहिला तर क्षणभरही त्यांना उसंत नव्हती. महत्वाचे अनेक आंदोलने याच काळात त्यांनी यशस्वीरीत्या लढलीत. नियतकालिकाचे, संस्थांचे, प्राध्यापक-वकील, सिनेटचे सदस्य, विधीमंडळाचे सदस्य अशा एक ना अनेक पदावर ते कार्यरत होते. एव्हाना संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळख मिळाली होती. जरी आर्थिक स्थिती बरी झाली असली तरी नगद रक्कम देऊन घर किंवा जागा घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथिल दत्तोबा पवार यांना लिहिलेल्या एका पत्रातून या संदर्भात पतपेढीतून कर्ज मिळवण्यासंदर्भात विचारणा केल्याचे समजते. मात्र पतपेढीतून कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांनी मुंबईच्याच सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून कर्ज घेतले. मुंबईच्या हिंदू कॉलनित ५५५ चौरस यार्डाचे अनुक्रमे दोन प्लॉट विकत घेतलेत. प्लॉट नंबर ९९ आणि प्लॉट नंबर १२९. दोन प्लॉट घेण्याचा उद्देश हाच की एका प्लॉटवर राहण्यासाठी तर दुसऱ्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठी घर बांधावयाचे होते. ही जागा त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवली होती. दादर-माटुंगा स्कीम अंतर्गत बॉम्बे इमप्रूव्हमेंट ट्रस्टकडून ५०० रुपये भरून ती त्यांनी विकत घेतली होती. त्याचे दस्तावेज अजूनही उपलब्ध आहेत. या जागेचे भूमिपूजन सप्टेंबर १९३० ला करण्यात आले. पालये शास्त्री यांनी भूमिपूजन केले. या भूमिपूजनाचा प्रसंग प्रत्यक्षदर्शी असणारे खैरमोडे सांगतात – “रमाबाई आणि बाबासाहेब यांच्या हस्ते चार कोपऱ्यांवर चार तांब्यांची छोटी भांडी खोल गाडण्यात आली. १९३० ची नाणी आणि रमाबाई आणि बाबासाहेब यांच्या सह्यांच्या तारखेसह चिठ्ठ्या त्या भांड्यात ठेऊन ती गाडण्यात आली. या समारंभास बाबासाहेबांच्या चाळीतील पाच सवाष्णी उपस्थित होत्या.” या विधी प्रसंगी बाबासाहेबांचे सहकारी उपस्थित होते त्यात देवराव नाईक, बापू सहस्त्रबुद्धे, वकील काणेकर, मडकेबुवा, धोंडीराम गायकवाड इत्यादी. हा भूमिपूजनाचा विधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पारंपारिक पद्धतीने केला त्याचे कारण आपण समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्यावेळच्या अनेक लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. की स्वतःला रॅशनॅलिस्ट म्हणविता मग हा समारंभ का केलात? त्यावर डॉ. बाबासाहेबांनी या प्रमाणे उत्तर दिले, ‘रॅशनॅलिस्ट माणसाला बायको, मुले, समाज, काळवेळ याकडेही लक्ष देणे प्राप्त आहे. तो प्रत्येक वेळी रॅशनॅलिझमला बळी पडू लागला की त्याच्या हातून काही होणार नाही.’ हा १९३० चा काळ आहे. बाबासाहेबांनी अजून बौद्ध धम्म स्वीकारला नाही आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता कि हिदू धर्मात राहूनच सुधारणा घडवून आणाव्यात. मात्र १९३५ नंतर त्यांच्या ह्या विश्वासाला तडे गेले आणि त्यांनी धर्मांतराची घोषणा येवल्यात केली. त्यामुळे वरील उत्तर कालोचित आहे.
भूमिपूजन झाल्यानंतर एक-दीड महिन्यांनी घराचे बांधकाम जानेवारी १९३१ ला सुरुवात झाली. आज जिथे राजगृह आहे ती जागा प्लॉट नंबर १२९ नंबरचा. ही इमारत पूर्ण व्हायला १९३३ साल उजाडले. तसेच प्लॉट नंबर ९९ वर ‘चारमिनार’ नावाची इमारत १९३२ ला बांधण्यास घेतली. या दोन्ही इमारतीचे बांधकाम आगे-मागे पूर्ण झाले. त्यातील प्लॉट नंबर १२९ (पाचवी गल्ली) या इमारतीचे नाव राजगृह’ असे ठेवले गेले. या इमारतीतील रचना ही स्वताला राहण्यासाठी घर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंजिनियरला स्वतःच्या देखरेखीखाली आराखडा बनवून घेतला होता. या घरांच्या बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी श्री. आसईकर (आसईकर वकील यांचे वडील ) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्याच बरोबर मुकुंदराव व यशवंतराव यांचीही देखरेख या बांधकामावर होती. राजगृहाची रचना अशी की तळमजल्यावर तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स स्वत:च्या कुटुंबासाठी आणि पहिल्या मजल्यावर बाबासाहेबांची लायब्ररी, ऑफिस आणि तिथेच राहण्याची झोपण्याची व्यवस्था केली होती. तर दुसरी इमारत प्लॉट नंबर ९९ (तिसरी गल्ली) या इमारतीला त्यांनी ‘चारमिनार’ असे नामकरण केले होते. आज ही इमारत ‘रामगुंफा’या नावाने उभी आहे.
‘राजगृह’ हे नाव देण्यामागेही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या घोषणेपूर्वी त्यांचा अनेक धर्मांचा अभ्यास सुरूच होता. त्यात जवळचा आणि भारतीय समतावादी धम्म बाबासाहेबांना जवळचा व आपला वाटला. व त्याकडे ते आकृष्ट झाले होते. म्हणूनच बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानातील व बुद्धाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या स्थळाचे नाव त्यांनी आपल्या घराला दिले. बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील राजगृह हे स्थळ मगधाची पहिली राजधानी होती. राजागृहाला अनेक बौद्ध सत्ताधाऱ्यांचे कार्यकाल अनुभवास आलेत. बिम्बिसार, अजातशत्रू व खुद्द बुद्धाचा वावर इथे होता. अश्या बुद्धाच्या वारसा लाभलेल्या याच भूमीत पहिल्या बौद्ध संगीतीत निर्माण झालेले ‘विनिंपिटक’ याच धरतीवर लिहिले गेले. असा हा ‘राजगृह’ चा ऐतिहासिक संदर्भ घेऊन बाबासाहेबांनी आपल्या घराला ‘राजगृह’ हे सार्थ नाव दिले.
बाबासाहेबांना ग्रंथासाठी घर करण्यासाठी त्यांचे ग्रंथप्रेम कारणीभूत आहे. याची प्रचीती त्यांचे ग्रंथ घेऊन येत असलेली जहाज बुडाल्यावर त्यांना जे अतोनात दु:ख झाले होते यावरून लक्षात येते. बी.आय.टी. चाळ परळ येथील अपुरी जागा व नित्य वाढणारा ग्रंथ संग्रह त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. इंग्लंड अमेरिकेतील ग्रंथालये त्याची भव्यदिव्यता कशी असते याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांनी राज्गृहाचा आराखडा बनविला होता. परळ येथील बी.आय.टी.चाळ सोडून त्यांनी १९३३ मध्ये पहिले कुटुंबाला स्थलांतरित केले नंतर लायब्ररी व नंतर बाबासाहेब राजगृहावर राहावयास आले. माता रामैने केलेल्या त्यागाचे हे स्वप्नपूर्तीतील घर पाहून जीव हरखून गेला होता. दर रविवारी चार वाजता त्या पोयबावडी च्या चाळीत जाऊन स्त्रियांना राज्गृहावर येण्याचे सप्रेम आमंत्रण देत. आपल्या मालकीचे घर होण्याचा परमोच्च आनंदच या प्रसंगावरून दिसून येतो. ‘चारमिनार’ इमारतीतील खोल्या भाड्याने दिल्या होत्या त्यातून मिळणारे मासिक भाडे होते त्यातून बाबासाहेब ग्रंथ खरेदीसाठी खर्च करीत. मात्र उरलेल्या पैशातून या काळात माता रमाईने अनेक दागिने केले होते. खैरमोडे सांगतात त्याप्रमाणे डिसेंबर १९३४ मध्ये त्या दागिन्यातील बरेचसे दागिने विकलेत. शिवाय चारमिनार इमारतही ९ मे १९४१ साली विकली.
एकूणच असा या राजगृह निर्मितीचा प्रवास आहे. या राजगृहावर अनेक दिग्गजांचे पदस्पर्श झाले आहेत. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनासाठी सतत राबता राजगृहावर असायचा. देशाचे संविधान निर्मितीचे अनेक पाने या राजगृहाने पाहिले आहेत. लाहोरच्या जातपाततोडक मंडळाच्या परिषदेसाठी तयार केलेले भाषण हिंदू धर्मावरील व वेदावरील टीकेमुळे नाकारले होते व ती परिषदच रद्द केली होती. ते भाषण नंतर पुस्तक रूपाने ‘अॅनिहीलेशन ऑफ कास्ट्स’ या नावाने प्रकाशित केले. हा ऐतिहासिक ग्रंथ राजगृहाच्या अचल भिंतीनी अनुभवला आहे. अनेक योजना, बेत या राजगृहाने पाहिले आहेत. ‘वेटिंग फोर व्हिजा’ हे बाबासाहेबांचे एकमेव स्वचरित्र इथेच शब्दबंधित झाले. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, त्याची ध्येय-धोरणे, जाहीरनामा याच अचल वास्तूत रचल्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मार्गदर्शकाची भूमिका डॉ. बाबासाहेबांची होती. राजगृहावर त्यासाठी अनेक दिग्गजांचा पदस्पर्श झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राची व्यूहरचना अनेकदा राजगृहात बसून केली गेली. त्यात प्रबोधनकार ठाकरे, कॉमरेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, सेनापती बापट सारखे विभूती सहभागी असायचे.
धर्मांतराची घोषणा केल्या नंतर इटालियन भिक्षू लोकनाथ यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन बौद्धधम्माचा स्वीकार करण्याची विनंती केली ती राजागृहावरच. तुम्ही शीख धर्माचा स्वीकार करा असे सुचवणारे हिंदू महासभेचे नेते डॉ. मुंजे यांनीही राजागृहावरच भेट घेतली होती. या राजगृहावर त्यांचा आवडता डॉग टॉबी याचा स्वच्छंद वावर होता. त्यांची आवडती कार याच राजागृहाच्या आवारातून या महामानवाला घेऊन जायची. या आणि अशा अनेक आठवणी या राजागृहाच्या कणाकणात साठवून आहेत.
बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वात दडलेला कलावंत थोडाबहुत राजगृहवर दुसून येतो. संगीताचे धडे घेणे किंवा संगीत मैफली ऐकणे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन शक्य नसायचे त्यामुळे राजगृहावर ते संगीताच्या मैफली आयोजित करायचे, एक अत्यंत हळवा प्रसंग या निमित्ताने सांगावासा वाटतो. तो असा, आपल्या व्यग्र कार्यातून सायंकाळी एखाद दिवशी संगीत ऐकण्याची इच्छा झाली की हक्काने बालगंधर्वांना पाचारण करायचे. राजगृहावर बालगंधर्व बाबासाहेबांच्या आमंत्रणाला आवर्जून मान देत. अशाच एका मैफलीत कार्यक्रम रंगतदार झाला. बाबासाहेबांच्या आवडीच्या अनेक रचना त्यांनी तल्लीन होऊन गायल्या. आणि बाबासाहेबांनी बालगंधर्वांना संत चोखामेळा यांचा अभंग “जोहर मायबाप जोहार” गाण्यासाठी विनंती केली. चोखोबांचा ‘जोहार मायबाप जोहार” हा अभंग एवढ्या आत्मीयतेने तल्लीन होऊन बालगंधर्वांनी गायला की बाबासाहेबांना डोळ्यातील अश्रूंच्या धारांना रोखता येणे अशक्य झाले. ‘राजगृहा’ने हा हळवा भावबंध साक्षात अनुभवला.
संपूर्ण जगात ग्रंथासाठी घर बांधणारा एकच महामानव होता नभूतोनभविष्यती आयुष्याच्या उत्तरार्धात बाबासाहेबांना दिल्ली सोडणे शक्य झाले नाही. मुंबईत आल्यावर ते राजगृहावर यायचे. अखिल आंबेडकरवाद्यांसाठी ही केवळ निर्जीव वास्तू नाही; तर ती अचल चेतानागृह आहे. ज्यात माझ्या बाबांच्या अनेक वारसांचा शेवटचा प्रवास इथूनच झालाय. माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर, माईसाहेब/ डॉ. सविता आंबेडकर यांच्या कलेवराचे अंतिम दर्शन राजागृहाने प्रचंड वेदनेने अनुभवले. म्हणूनच आमच्या स्फूर्तीचे, प्रेरणेचे ते चेतनागृह आहे.
Comments
Post a Comment