हिमालया माफ कर !
हिमालया,
तू इतका मोठा ?
साऱ्या पर्वतांना
लाजविणारा
इतिहासाची साक्ष
ठेऊन;
कित्त्येक शतकं
गाजविणारा.
तुझ्या हिमतीचीही
द्यावी दाद.
जगाचा अनभिषिक्त
सम्राट सूर्य
त्यालाही थोपवून
धरलंस तू
आणि आजही हे
अजिंक्यपद तुलाच?
हिमालया,
तू नाहीस नुसत्या
माती-गोटयाचा
तू नाहीस केवळ
उत्तुंग एकसंघ पाषाणाचा
तू नेसलेली
हिमवस्त्र उगीचच नाहीत,
तू नाहीसच केवळ
अचेतनाचा पुतळा,
तू आहेस सर्जनतेचा
महामेरू,
तू प्रसविल्यास
अनेक हिमनद्या,
तुझ्या आज्ञेने
थोपवून धरले उद्दाम मेघ,
आणि तुझ्याच
अंशातून जन्मल्या अनेक गंगा
तू शांतीचा
विजिगीषू स्तूप आहे.
तू सहनशीलतेचा कळस
आहे.
असंख्य तुफान,
वादळवारे तुला थरकापले,
तरी तू तसाच अविचल
आहेस.
हिमालया,
तू इतिहासाचा खरा
साक्षी
तुझ्याच देखत
म्लेंच्छ इथे आले
तुझ्या परोक्ष
पानिपत घडले
तू पाहिलेस अनेक
रणसंग्राम
तुझ्याच नजरेदेखत
घडला इतिहास.
तू पाहिली आहेस
देशाची फाळणी
जातीजातीत धर्माधर्माची
महापातके
आणि इथेच
विश्वशांतीचा प्रणेता ‘बुद्धदेखील’
हिमालया,
तू खरच खूप मोठा
आहेस
कारण आजही तुझं
अस्तित्व तसच आहे.
तुझं महत्पण
शब्दात लपेटत नाही,
हे खरं आहे, हा
इतिहास कधी लपत नाही
मात्र,
हिमालया माफ कर,
कारण तुझ्यावरही मात करून
तुलाच सर करणारा
द्विपाद माणूस होता
तुझ्याच शिखरावर जाऊन
जगाला चक्रावून सोडणारा
क्षणभर का होईना तुझ्यापेक्षाही
उंच होऊन तुलाच पराभूत करणारा
तुझं अद्वितीयपण इथेच संपवणारा,
माणूस. . .साधा माणूस. . .
आणि त्यातलाच शब्दातीत उत्तुंग नग
भारतभूमीच्या मूलनिवश्यांना,
नागवंशीय नागांना, दलित-पीडित, शोषितांना
जमिनीत घट्ट रुतलेल्या तुझ्या पायाप्रमाणे
पिढ्यानपिढ्या गाडून टाकलं होतं
त्या सर्व बहुजनांचा कैवारी
तुझ्यापेक्षा अगणित पटीने मोठा,
संविधानाचा महामेरू. . .
रंजल्या-गांजल्यांना नवजीवन देणारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तू पाहिलास. . .
हिमालया,
तू खरंच खूप मोठा आहेस, शंकाच नाही,
मात्र मला क्षमा कर आणि तूच ठरव
जगाला मायेची सावली देणारा,
खरा हिमालय कोण?
तूच ठरव . . . तूच ठरव. . .
-
पद्माकर तामगाडगे, मुंबई
··*··
best
ReplyDelete