|| सृजनवेध ||
अभिसरणाच्या व्यूहात माणूस
- डॉ. पद्माकर
तामगाडगे,
९८६९५८१६४७
हिप्पोलाईन तेन या समाजशास्त्रीय अभ्यासकाने समाजाचे होणारे
स्थित्यंतर आपल्या ‘समाजशास्त्रीय सिद्धांता’च्या माध्यमातून पटवून दिले. त्यात
त्याने वंश (Race),परिस्थिती
(milieu) आणि युगप्रवृत्ती(Moment) या तीन
घटकांवर समाजाचे परिवर्तन होत हे दाखवून दिले. बुद्धाने सांगितलेले सर्वकालिक सत्य
म्हणजे ही सृष्टी परिवर्तनशील आहे. या सृष्टीतील सर्व घटक हे अनित्य आहे आणि याचे
प्रत्यंतर आपणास लौकिक जीवन जगतांना येत असते.
जगाने कूस बदलली तो क्षण कोणता? हे सांगता येते. त्यासाठी
तेनच्या समाजशास्त्रीय सिद्धांताचा आधार घेत आपणास उत्तरे मिळू शकतील. साधारणतः हे
जग क्रमाक्रमाने विकसित होत गेले. जगातील प्रत्येक देशाची परिवर्तनाची गती
वेगवेगळी असली तरी झपाट्याने जग समांतर पद्धतीने बदलायला लागले तो काळ साधारणतः
१९६० नंतर . जगातील मागास देश पाश्चात्य आणि पौर्वात्य जगाच्या पदराला धरून
हळूहळू परिवर्तीत व्हायला लागले. माणूस
आपल्या बुद्धीचा वापर जेवढा जास्त करेल तेवढा विकास होईल. म्हणूनच दुसऱ्या
महायुद्धात बेचिराख झालेला जपान नव्याने उभा राहून इतर मागास देशांना मार्गदर्शक
ठरू लागला. ही आपत्ती जर जपानवर आली नसती तर कदाचित त्या देशातील लोकांनी आपल्या
कार्यक्षमतेचा वापरही केला नसता. ‘ज्याचं जळतं, त्यालाच कळतं’ या म्हणीनुसार
त्यांना इतर देशांच्या तुलनेत आपल्याला उभे राहायचे आहे हे ध्येय्य होते ; म्हणून
त्यांनी आपले धेय्य गाठण्यासाठी आपल्याजवळच्या सर्व कार्यक्षमतांचा उपयोग करीत
देशाला पुढे आणले. भारतावरही अस्मानी-सुलतानी संकटे भरपूर आली असली तरी
संस्कृतीच्या, परमार्थाच्या कचाट्यात विशिष्ट परिघात अडकल्यामुळे इथल्या लोकांना
त्याची तितकीशी जाणीव झाली नाही. त्यात महायुद्धात तटस्थ भूमिकेमुळे जागतिक झळाही
भारतीयांना बसल्या नाहीत. शिवाय इथल्या सामाजिक विषमतेमुळे विशिष्ट लोकांच्याच
हाती सत्ता असल्यामुळे सामान्य माणसाला आपल्या बुद्धीचा वापर करावा लागला नाही,
किंबहुना त्यांच्या बुद्धी गोठवून ठेवण्याचाच प्रयत्न अधिक प्रमाणात झाला. परिणामतः
तेव्हापासून आजपर्यंत आपल्या समाज प्रबोधनकारांनी इथल्या बुरसटलेल्या विचारसरणीला
धुवून टाकण्यासाठी हयातभर श्रम खर्च केले. तरीही हटवादी सनातनी आम्ही बदलणारच नाही
अशा आविर्भावात आजही वागतांना दिसतात. अशांच्या विचारसरणीला काळच उत्तर देतो आणि
आजचे वर्तमान ज्याला पाहता येते ते आज नव्याला स्वीकारते ; जे पाहू शकत नाही
त्यांना ‘जैसे थे’ मध्ये संतृष्टी मिळते. “जुने जाऊ द्या मरणालागुनी , जाळूनी
किंवा पुरुनी टाका | सडत न एक्या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका !” या हाका
ज्यांनी ऐकल्या ते आज प्रगतीच्या पथावर असल्याचे दिसेल. ज्यांनी मुद्दामून ऐकायचेच
नाही असे ठरविले ते आज कुठे आहे ? हे सजग माणसांनी चिंतन केल्यास त्याला उत्तर जरूर
सापडेल.
माणूसच शतकं घडवीत असतो. माणसाच्या बुद्धिसामर्थ्याने तो
आपल्या जीवनात सुख, सुलभता आणण्याचा प्रयत्न करीत असतो. कालानुरूप त्याला जुन्या
काळच्या गोष्टी जुन्या वाटतात म्हणून तो नवनवे शोध घेत असतो. आजचा माणूस कसा आहे?
त्याला नेमके काय हवे आहे? जीवनाकडे तो काय मागतो? हेच नव्हे तर आपण कशासाठी जगतो?
याचा कुणी विचार करतात का? यावर आजचा
माणूस म्हणेल एवढी सवड कुणाजवळ आहे ? याचाच अर्थ असा की तो जीवन हरवून बसला आहे ;
धेय्य हरवून बसला आहे. असा घ्यावा का? हेच तर चक्रव्यूह आहे. प्राचीन कालखंडाचा
विचार केला तर आपल्याला लक्षात येते की, चार्वाकाचे शतक, बुद्धाचे शतक या नंतर
जाणीवपूर्वक निर्मिलेले ईश्वराचे शतक सुरु होते. राम, कृष्ण यांचे. धर्मसंस्थापक
ते ईश्वरीकरण हा प्रवास विभूतीपूजक संस्कृतीचा दिसतो. महावीर, येशुख्रिस्त,
मोहम्मद पैगंबर अशा धर्मसंस्थापकांचे हे शतक होते. नंतर त्यांच्या अनुयायांनी
त्यांना ईश्वराप्रत आणले. जम्बुद्विपामध्ये अनेक छोटी-छोटी गणराज्य होती. परकीय
आक्रमणांनी आणि इथल्या प्रतीगाम्यांनी नासधूस करून सत्तांतराचा खेळ सुरु केला.
त्यातूनच राजधर्माला विशेष स्थान प्राप्त झाले.
त्यातही गणतंत्राची पताका फडकवणारे मौर्य घराणे शुंगाच्या काळापर्यंत
अस्तित्वात होतेच. ही शतके अनेक शूर वीर योद्ध्यांच्या सम्राटांची गाथा सांगणारे आहेत.
नंतर संतांचे युग सुरु झाले. त्यानंतर साधू बैराग्यांचे (ढोंगी आणि प्रामाणिक असे
दोन्ही) शतक सुरु झाले. या सगळ्या शतकांची जळमटे साफ करण्यासाठी समाजसुधारकांचे
युग सुरु झाले. यातून नेतृत्व उभे राहिले काही करते सुधारक झाले तर काही आदर्श
सुधारक झाले किंवा काहींनी आपली पोळी भाजून घेण्यासाठी आदर्शवादाचे पांघरून घेतले. आज कोण सच्चे व कोण लुच्चे दिसत
असले तरी काळाच्या प्रभावाने तेही लोकनेतेच ठरले. त्यातून राजकारणात उतरले ते
राजकीय पुढारी झाले. माणसासाठी झटणारे मात्र वस्त्यावस्त्यातून माणूस उभारत
राहिले. स्वार्थी नेतृत्व करणारे पक्ष स्थापन करून स्वतःच्या व जातीच्या
अस्तित्वाची मोर्चेबांधणी करीत राहिले त्यात माणूस लहान-लहान होत जाऊन आज खुजा
झाला. तिकडे माणसाला मोठे करण्यासाठी ‘कृती-उक्ती’ला प्रमाण मानून ‘बोले तैसा
चाले, त्याची वंदावी पाऊले’ याची प्रचीती देत राहिले. ही शतके खरी तर याच
महामानवांची.
ही जी शतके निर्माण झाली ती ईश्वरांचे, धर्मसंस्थापाकांचे,
सम्राटांचे, समाजसेवकांचे, महामानवांचे. सुरेश द्वादशीवारांच्या मते आजचे शतक
वरीलपैकी कुणाचेही नाही. हे त्यांचे मत रास्तच आहे. कारण वर्तमानकाळात कुणीही धर्म
स्थापन करू पाहत नाही, ईश्वरही मानवनिर्मित होता आज कुणी ईश्वरही निर्मित करीत
नाही, संविधानाने दिलेले त्याचे मूलभूत अधिकार समजल्यामुळे त्याची समूहधार्जिणी
मनोवृत्ती जी धर्माला-जातीला चिकटून होती
तिचे महत्व कमी झाले. हळूहळू ते नष्टच होईल. आता माणूस स्वायत्त झाला. म्हणून
अण्णा हजारेंसारखे नेतृत्व क्षणिक होते, आज प्रत्येक माणसाचे डोके स्वतःच्या
डोक्यावर असल्यामुळे तो विचार करू लागला आहे.(कधीकधी काही काळासाठी हरवते ;
उशिराने मग पुन्हा ते ते डोके आपापल्या धडावर जाऊन बसते. हे सांप्रत सत्य सर्वांस
अनुभवास आलेलं) त्यामुळे त्याच्या अभिसरणाची ही प्रक्रिया प्रचंड वेगाने सुरु झाली
असून आज माणूस पक्ष स्थापन करेल, संघटना स्थापन करेल, संस्था उभारेल पण धर्म
स्थापन करणार नाही, तो महामानव तर सोडाच मागे चार सच्चे कार्यकर्ते उभे करणे कठीण
होईल (भाड्याचे कधीही मिळतील) येत्या
काळात कोणत्याही ईश्वराची पैदा होण्याची आज बिशाद नाही. कारण माणूस चिकित्सक होत
आहे. असे असले तरी या सृजनाची त्याला अजूनही ओळख झाली नाही. तो पुरता गोंधळलेला
आहे. कारण सर्व वैचारिकतेचा मारा त्याच्यावर माध्यमांकरवी होत आहे. त्यात त्याला
शांत विचार करून निर्णयापर्यंत पोहचू न देण्याचे इथल्या माध्यमांच्या पक्षपाती,
प्रतिगामी धोरणाने ठरविले आहे. याचे नुकसान स्वतःचेही होत आहे हे त्यांना अजूनही
कळत नाही. भारत देश विश्वात सर्वात पुढे असता, जगाची नाळ आज आपल्या हाती असती. ही
अतिशयोक्ती नाही. जर आणखी १० वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगले असते तर ही
अतिशयोक्ती वास्तव ठरली असती यात कुणालाही शंका घेण्यास वाव नाही.
जगण्याची साधने आज बदललेली आहेत. माणूस एकलकोंडा, संवेदनशून्य
होण्याकडे त्याची जीवनशैलीच त्याला घेऊन चालली आहे. त्यात त्याचा दोष नाही तर
समग्र जीवन व्यवहाराचा दोष आहे. माणूस पैसा कशासाठी कमावतो? हे कमावण्याच्या नादात
तो विसरून जातो आणि जेव्हा तो रिटायर्ड होतो तेव्हा त्याच्याजवळ आयुष्य जगण्यासाठी
उरत नाही. आयुष्यातले उमेदीचे क्षण त्याने केवळ भरपूर पैसे कमाविण्यासाठी
घालविलेला असते. आता संपत्ती अफाट आहे मात्र आयुष्य नाही. गेलेले तारुण्य पुन्हा
पैश्याने विकत घेता येत नाही. इथे त्याच्या आयुष्याचा प्रवासच संपतो. त्याचे हे
आयुष्य कुणासाठी होते ? माणसासाठी की स्वतःसाठी? याचे उत्तर कुणासाठीही नाही. . .
हेच वास्तव नाही का? विल डयूरांट म्हणतो “Science gives us knowledge, but only philosophy can give us wisdom” भौतिक प्रगतीपेक्षा माणसाच्या
वैचारिक प्रगतीमध्ये माणसाच्या आयुष्याचे समाधान असते. मग जीवनाला सुंदर
करण्यासाठी आत्मीयतेचा, प्रेमाचा, बंधुभावाचा पाझर माणसा-माणसामधून केव्हा पाझरेल?
हे अभिसरणाचे व्यूह भेदल्यानंतर. . . नक्कीच.
असाच आशावाद ठेवूया ! नवा माणूस जन्माला यावा, फक्त माणूस म्हणूनच! या
सृजनाची ही नांदी ठरावी.
· · * · ·
Comments
Post a Comment