आम्ही भारताचे लोक....
भडक माथी कडक केली
परजलेल्या पोलादासारखी
धर्मनांगीचे विष ओतून
पोलादाला तडक दिली.
आता पोलाद तुटेल
किंवा शिर कटेल
पानापानतले मुलतत्त्वे वाचून
एकेक श्लोक दहन केला
त्या प्रतिशोधाचा क्षण आला
भडक माथी दक्ष झाली
दीक्षाभूमी लक्ष्य केली.....
पहिलेच पान ; यज्ञात दान...
"We The People of India...
आम्ही भारताचे लोक....."
आम्ही भारताचे.... आम्ही आम्हालाच जाळतोय...
आम्ही आमचेच स्वदहन करतोय...
आम्ही भारताचे, भारत आमचा
मी भारताचा, भारत माझा
मग....
भडक माथी नरमली
मनातल्या मनात शरमली
ग्रंथाची पाने उलटली
'We The People of India...
आम्ही भारताचे लोक....'
मी भारताचा ; भारत माझा
जत्था विव्हळला, आणखीच खवळला
'ही दगडं कुणी पेटवली?...'
जत्था ज्वाला होऊन वळला
आता पेटवूनच द्यायचे ठरले...
दीक्षाभूमीला पाठ देऊन,
जत्था विरुद्ध दिशेने सरसावला
'भडक माथी कडक करणा-या
कारखाण्याला भडाग्नी द्यायला...'
आता लक्ष्य बदलले....
आता भक्ष्य बदलले...
आम्ही भारताचे लोक...
आम्ही भारताचे लोक...
आम्ही भारताचे लोक...
कवी - पद्माकर तामगाडगे, मुंबई
Comments
Post a Comment