बंधनरहित जगाची परिणामकारकता
संपूर्ण जग हे अशा उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे की आता तो समूहधार्जिणा राहिला नसून स्वायत्त व्हायला लागला आहे. ही नव्या विश्वाची नांदी आहे. याचे फायदे-तोटे ज्याच्या त्याच्या संकल्पनेतून वेगळेवेगळे असू शकेल. जागतिकीकरणाच्या काळात जगातील अखिल मानवांच्या प्रादेशिक सीमांना अनिर्बंधता प्राप्त झाली आहे. स्थलकालातीतता ही सध्याच्या जीवन व्यवहाराची वास्तव संकल्पना झाली आहे. रसेलने सांगितलेल्या ‘जागतिक नागरिकत्व’ ह्या संकल्पनेला पुढे व त्याच्या आधीही अनेकांनी स्वीकारले व त्याचा पुरस्कार देखील केला आहे. आजवरची तत्वज्ञ, विचारवंत हे असेच वैश्विक, स्थलकालातीत आहे. अशा जगण्याच्या भव्य संकल्पनेला त्यांनी मान्यताच दिली आहे. प्लेटो म्हणत असे ‘तत्वज्ञ माणसाला कायदा लागू होऊ नये.’ कारण तो सृजनाचा कर्ता असतो. ग्रीक मध्ये जन्माला आलेले व तत्वज्ञानाची समृद्ध परंपरा जगाला सांगणारे सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरिस्टॉटल यांनी कधी देशाच्या सीमा आखून घेतल्या नाही व दिल्याही नाही. बुद्धाने अखिल मानवाच्या दु:खाचीच कारणे व उपाय सांगितले. ‘प्रतीत्यसमुत्पाद’,‘निब्बाण’ हे केवळ भारतीय (त्या वेळचे जम्बुद्वीप) जनतेसाठीच सांगितले आहे असे नाही. तर धर्मातीत, स्थलकालातीत असणाऱ्या सबंध मानवांसाठी सांगितली गेली. ‘नागरिकत्वा’ची संकल्पना सोयीसाठी व सुरक्षेसाठी असते.
“नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!”
या कवी केशवसुतांच्या कवितेप्रमाणे जर मानवनिर्मित नियम मानवांच्या प्रगतीस बाधक ठरत असतील तर ते नियम झुगारून दिले पाहिजेत. हा परिवर्तनशील विचारच ते अभिव्यक्त करतात. आजचे इस्रायल नव्हते तेव्हा ज्यूंचा कोणता देश होता? व त्यांचे कोणते नागरिकत्व मानावे?, स्पिनोझला धर्माने बहिष्कृत केले, मार्क्सला देशोदेश हिंडावे लागले, सिग्मंड फ्राईडचेही तसेच, व्हॉल्टेअरला फ्रांसने हद्दपार केले, अल्बर्ट आईनस्टाईनने धर्म आणि देश दोन्हींचाही त्याग केला होता. मग यांना कोणत्या देशाचे नागरिकत्व देणार?. . . . बुद्ध कोणत्या देशाचे हे काही वर्षांनी कदाचित सांगणेही कठीण होईल. कारण बुद्धाची शिकवण ही अखिल मानवांसाठी आहे. माणसांनीच माणसाच्या चौकटी कराव्यात. आणि त्यांच्या तत्वज्ञानाला आणि विचारला चौकाटीपुरतेच बंदिस्त करावे ही माणसांची कुपमंडूक वृत्ती आहे. तत्वज्ञ, विचारवंत, ज्ञानी व सत्यांवेषणात गढून गेलेले कोणत्याही देशाचे, राष्ट्राचे, धर्माचे, भाषेचे असत नाही. ते वैश्विक होतात.
उपरनिर्देशित सगळे महापुरुष हे विश्वाच्या कल्याणासाठी जगले. सामान्य माणसांनाही त्यांच्या प्रेरणेने विश्वबंधुत्वाने वागण्यास काय हरकत आहे. भारतीय राजकारण आज कुण्याही एका पक्षाच्या हाती राहिले नाही. म्हणून गोंधळलेले राज्यकर्ते संवेदनशील, भावनिक मुद्द्याला हात घालून धर्म-संस्कृतीचे राजकारण करीत. आपला स्वार्थ साधून मतांची पुंजी गोळा करतात. धार्मिक-जातीय दंगली घडवितात, ‘आदिवासींची संस्कृती जपली पाहिजे’ म्हणजे काय? त्यांनी पिढ्यानपिढ्या जंगलात उघडे-वाघडेच हिंडत राहावे ? २१ व्या शतकात ज्ञान-विज्ञान-शिक्षण व भौतिक सुखापासून त्यांनी वंचितच राहावे ? हे न कळण्या इतपत दुधखुळा माणूस आता उरला नाही. खेड्यापाड्यातील माणूस आता चावडीवर जागतिक राजकारणापासून गल्लीतील राजकारणाच्या बाता मारीत असतात. त्यातून तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचले आहे. येणा-या पाच-दहा वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. आणि भारतात जसे बुद्धकालीन ‘नालंदा’, ‘तक्षशीला’ विद्यापीठात देशो-विदेशाचे असंख्य विद्यार्थी संशोधक शिक्षण घेत होते तसे पुढेही आपल्या देशात येईल. आपल्या देशाचेही विद्यार्थी विविध देशात शिक्षणासाठी व नोकरीसाठी जातील. तेव्हा ‘मुंबई आमची’, ‘महाराष्ट्र आमचा’ म्हणाना-यांना केविलवाणे होऊन बघण्याशिवाय काय करता येईल? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार दुस-या देशात स्थलांतर करण्याचा अधिकार दिला आहे. “Right to Emigrate is the Fundamental one.” तसेच इतर देशातील बांधवांनाही कायदेशीर परवानगीने आपल्या देशात सामावून घेणे पर्याप्तच आहे. युनायटेड नेशन (UN) च्या घटनेत कलम १३ नुसार “कोणीही आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही देशात राहू शकतो आणि तो त्याचा घटनादत्त अधिकार आहे.” (Everyone has the right to leave any country, including his own.) याचा अर्थ स्वैर असे कुणी कुठेही जाऊन राहणे असा होत नाही. कलम १२ अन्वये झालेल्या जागतिक ट्रीटीनुसार “International covenant on civil and political rights” या हक्काला कोणीही बंधने घालू शकत नाही फक्त देशाची सुरक्षा, जनतेचे हित, हक्क याचे सीमोल्लंघन होऊ नये. एवढी खबरदारी घेतली पाहिजे.
‘जागतिक नागरिकत्व’ हे नव्या पिढीला अपरिहार्य वाटावे असे होणार आहे. ही त्या वेळची निकड होणार आहे. जर ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत आपल्या घराला, गावाला गोंजारत बसले. तर त्यातून विकासात्मक काही साध्या होणार नाही. वैदिक काळात समुद्र गमन करणे पातक मानले जायचे म्हणून परदेश गमन हे सुद्धा पाप होते. आज आपण त्यातच खितपत पडलो असतो तर आज विकसनशील देश म्हणून जागतिक पातळीवर भारताला जे स्थान आहे ते नक्कीच नसते. आज कोणताही निर्णय घेतांना मोठ-मोठ्या देशांना भारताला वगळून चालत नाही. भारताचा विचार करणे भाग पडते. त्यामुळेच अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या राजकारणात भारतीय अमेरिकन उच्च पदावर आहे. उदा. बॉबी जिंदाल, निक्की प्रांतीय गव्हर्नर पदभार सांभाळत आहे. परदेशात शिक्षण घेऊन जागतिक मानाच्या अनेक मानद पदव्या व पुरस्कार भारतीयांना मिळाल्या. त्या याच वैश्विक वृत्तीमुळे. नोबेल पुरस्कार भारतीयांना मिळाले श्री चंद्रशेखर भौतिकशास्त्र, गोविन खुराना औषधशास्त्र, व्ही. रामकृष्णा रसायनशास्त्र, अमर्त्य सेन अर्थशास्त्र यांना जर का देशाने मज्जाव करून भारतीय शिक्षण व्यवस्थेतच ठेऊन त्यांच्या प्रतिभेची ओळख जगाला दाखविण्याची संधीच दिली नसती तर ते आज कुठे असते?
सध्या जागतिक मंदीचे वारे असले तरी भारतीय प्रतिभा जगासमोर अग्र क्रमवार आहे. या प्रतिभावंत पिढीने इथेच शिक्षण घेतले. एक डॉक्टर, इंजिनियर घडविण्यासाठी एक ते सव्वा करोड रुपये शासन खर्च करते आणि त्यांचे शिक्षण झाले की त्या शिक्षणाचा फायदा मात्र परदेशांना होतो? अशी ओरड सर्वत्र होते. मात्र हे अतिशय चुणचुणीत मुले देशाच्या गंगाजळीत किती भर घालीत आहे. याचा कधी विचार केला आहे का? एका सर्वेक्षणानुसार अशा भारतीय असलेल्या व विदेशात नोकरी करणा-या मुलांकडून जवळजवळ ६० बिलियन डॉलर दर वर्षी भारतात येतो. एनआरआय बँकेत ३० बिलियन डॉलर भारतीय बँकेत जमा केले जातात. म्हणजेच जवळपास ९० बिलियन डॉलर दर वर्षी भारतात परकीय गंगाजळी जमा होते. हेही नसे थोडके. या तुलनेत या विद्यार्थ्यांवर होणारा खर्च अत्यल्प आहे. असे असून देखील मायेची ओढ त्यांना ओढून परत मायभूमीत परत घेऊन येतेच. विशिष्ट ध्येयपूर्ती झाली की ही प्रतिभावान मुले मायदेशी परत येतात. त्यांचे गेल्या २-३ वर्षापासूनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
आज भारतात मात्र या प्रतिभावानांची मुस्कटदाबी सुरु केली आहे. तेही राजकारणाचाच भाग म्हणून. अरे देशाच्या चिंधड्या-चिंधड्या होत पर्यंत तुम्ही फक्त स्वार्थाचेच राजकारण करणार आहात काय? “दुस-या देशात उच्च शिक्षण आणि स्थाईक होण्यास मज्जाव” करणारे विधेयक आणण्याचा घाट सध्याचे सरकार घालीत आहे. मात्र परकीय विद्यापीठांसाठी आपल्या जागा देण्यास केव्हाचेच तयार होऊन बसले आहेत. याचा अर्थ म्हणजे एखादा दारुडा घरातील छप्पर विकून असले नसले सर्व विकून दारू ढोसतो व बरबाद होतो. तसे देशाला विकायला काढले की काय? असे भांडवलवाद्यांच्या आहारी जाऊन तुम्ही विनाशाकडे वाटचाल करीत आहात ; हे कुणालाच कसे दिसत नाही? येणा-या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही? माझे हे विधान उपरोक्त विषयाशी विरुद्ध असल्याचे भासेल. मात्र आपल्या देशातील साधन सामुग्रींचे सुनियोजित उपयोजन करून ; या तरुणांच्या प्रतिभेला योग्य संध्या दिल्या तर इतर देशात त्यांना कशाला जावे लागेल? भारतीय विद्यापीठांना ‘नालंदा-तक्षशीला’ सारखे रोल-मॉडेल बनविले तर आपल्या भारतीय विद्यापीठांच्या शाखा देशोविदेशात उभाराव्या लागतील. हे ध्येय ठेवले तर आणि गल्लीचं आणि गलीच्छ राजकारण सोडले तर देश नक्कीच पुढे जाईल, सोबत माणूस मोठा होईल, जग सुखी होईल. आपल्या घरी खायला मिळत नाही म्हणून दुस-याच्या दारात जाऊन काहीतरी खायला मिळेल अशी वाट पाहत बसने ही लाचारी नव्हे का? म्हणूनच स्वत:ला सामर्थ्यवान करा. मनगटात अगणित हत्तीचे बळ आहे स्वाभिमानाने त्याचा सुयोग्य वापर करा. मग अनेक जागतिक संधी खुद्द आपल्या पावलाने तुमच्यापर्यंत चालत येतील. तेव्हा कुठलेही बंधने तुमच्या आड येणार नाही.
बंधनरहित जग हे तळपत्या शस्त्रासारखे आहे. त्या शस्त्राचा वापर कशासाठी करायचा तो वापरणाऱ्याच्या हाती असतो. तसेच बंधनरहित जग हे माणसाच्या नैतीकमूल्यावर, विश्वबंधुतेवर, माणुसकीवर, समतेवर आधारित असेल तर जगाचे नक्कीच कल्याण होईल. त्यासाठी आधी ‘माणूस’ घडला पाहिजे.
बंधविरहित, बंधनरहित जगाची परिणामकारकता कशी असेल? याबद्दल हॉब्ज म्हणतो की, उद्याचे जग हे ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने ; जो बलवान तो शासक, बाकी सर्व गुलाम. असे असेल की, रुसो सांगतो त्याप्रमाणे, मुक्त, स्वच्छंदी, बंधनरहित माणसांचे जग हे पृथ्वीवरील नंदनवना सारखे असेल. . . आम्हास असे वाटते की ‘बहुजन हिताय;बहुजन सुखाय’ असेच असेल . . .
-प्रा.डॉ.पद्माकर तामगाडगे,
• • • • •
|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...
mast lekh dada
ReplyDelete