|| सृजनवेध ||
माझा देश श्रीमंत आहे ! पण . . .
- डॉ. पद्माकर तामगाडगे
देशाच्या आर्थिक विकासात देशाकडे असणाऱ्या नैसर्गिक साधन
संपत्तीचा सर्वाधिक व महत्वाचा सहभाग असतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जमिनीची
सुपीकता इतर देशांच्या तुलनेत चांगली असली तरी जागतिक स्पर्धेत लोकसंख्येच्या
तुलनेत या साधनसंपत्तीचा विनियोग व्यवस्थापनेच्या अभावी झालेला नाही. त्यामुळे
जगात विकसनशील देश म्हणूनच भारताला आजचे स्थान मिळाले आहे. भारतात नैसर्गिक साधन
संपत्तीचा मुबलक साठा आहे. अनेक देश भारतातील ‘पेटंट’ घेऊन जातात आणि आपण
त्यांच्या कडे फक्त पाहातच राहतो. ही संपत्ती वनसंपत्ती, धातू, मूलद्रव्ये, जमीन,
महासागर, वातावरण कोणत्याही माध्यमाची असू शकते. माणसांसाठी उपयुक्त अशा निसर्गातील
अनेक घटकांना नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात. एखादा नैसर्गिक द्रव्य माणसाच्या
बुद्धी कौशल्याच्या आधाराने उपयोगात आणून मानवी जीवन सरल, सुखावह करतो. हे करीत
असतांना निसर्गाचा समतोल साधनेही माणसाच्या हाती असते. ही साधनसंपत्ती भौतिक
सृष्टीमध्ये असते. वनस्पती, प्राणी, खनिजे, पारंपारिक उर्जा स्रोत, वातावरण, माती,
जमीन, पाणी इ. मात्र ही साधनसंपत्ती निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी
लागतो. त्यामुळे मानवाच्या हाती जेवढी साधनसंपत्ती आहे त्याचा अतिशय काटकसरीने
उपयोग करावा लागतो. त्याचा अवास्तव वापर केल्यास पुढच्या पिढ्यांना गंभीर परिणामास
सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
मुख्यता खनिजे, तेल, कोळसा यांच्या प्रक्रियेस हजारो
वर्षाचा कालावधी लागतो. सूर्यापासून मिळणारी उर्जा भारतात अजूनही पाहिजे त्या
प्रमाणात वापरली जात नाही. भारतात अरब देशांच्या तुलनेत खनिज तेलाचा अभाव आहे हा
नैसर्गिक भेद त्यात्या प्रदेशागणिक असतो. कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतर
उरलेल्या अवशेषातून प्लॅस्टिक,
प्रक्षालके, कृत्रिम रबर, खते, स्फोटके, रंगद्रव्ये इ. बनविली जातात. खनिज तेलाच्या उत्पादकतेसाठी
प्रामुख्याने अमेरिकेची
संयुक्त संस्थाने, रशिया, व्हेनेझुएला, सौदी अरेबिया, कुवेत, इराण, इराक, लिबिया, कॅनडा, मेक्सिको, रूमानिया व इंडोनेशिया इ. देशांचा मोठा सहभाग आहे. सध्या अणू उर्जेचा सर्वच विकसित देशांमध्ये वापर
होत आहे. मात्र नुकत्याच जपान मध्ये आलेल्या त्सुनामीच्या पर्वावर अणूप्रकल्पाला
झालेला अपघात व इतिहासाने पाहिलेले अणूस्फोटांचे परिणाम यामुळे भारतासारख्या
देशातील संवेदनशील माणूस अशा प्रकल्पाला सुरक्षेच्या हेतुस्तव मान्यता देणार नाही.
मात्र अणूउर्जेपासून होणारे प्रदूषण हे दगडी कोळशाच्या व जल-उर्जेच्या तुलनेत कमी
आहे. ती युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम पासून मिळविता येते. विविध वैद्यकीय
चिकित्सेसाठी अणू उर्जेचा वापर होतो तसेच वीज निर्मिती व अभियांत्रिकी कार्यातही
वापर केल्या जातो. भारतात थोरियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भविष्यात त्याचा
सुयोग्य उपयोग करून देशाच्या भौतिक उर्जास्त्रोत्रातील प्रथम पर्याय म्हणून
पेट्रोल, डीझेल ऐवजी वापरता येऊ शकेल. भारतात दगडी कोळशाचे मुबलक साठे आहे.
कोळशाच्या उत्पादकतेत मुख्यतः अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, ग्रेट ब्रिटन, पोलंड, चीन व भारत हे देश अग्रस्थानी आहे.
जगाच्या इतिहासात पाहिले तर ग्रेट ब्रिटन, जर्मनी, अमेरिका
या देशांची भरभराट झालेली दिसते. कारण त्या देशामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक
असून त्याचा विनियोगही करण्याची क्षमता त्यांनी निर्माण केली. लोहखनिज, दगडी कोळसा
आणि चुनखडी तिथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भारतातही या सर्व गोष्टी उपलब्ध आहे.
मात्र देशाची घडी म्हणावी तशी अजूनही बसत नाही. कारण या देशात विविध जाती, धर्म,
वंश, वर्ग या व्यवस्था कार्यरत आहेत त्यामुळे विधायक कार्यांकडे लक्ष देण्या ऐवजी
विघातक कार्यातच कार्यमग्न असलेले दिसतात. मग त्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा
कोणत्याही संघटना असोत. त्यामुळे देशाचे सूत्र सांभाळणाऱ्या शासनसत्तेवर कोणताही
पक्ष असला तरी त्याला हे भावनिक मुद्दे आधी लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे
देशाच्या आर्थिक व जागतिक नामांकनात आपण नेहमीच आपटी खात आलेलो आहे. औद्योगिक
क्षेत्रात आपण अजूनही मागासच आहोत ही खंत प्रत्येक भारतीयांच्या मनात आहेच.
आपल्याकडे काय आहे ? याचे भान जेव्हा उरत नाही तेव्हा
‘कस्तुरीमृगा’सारखी अवस्था होते. आपल्या क्षमतेचा वापर भारत अजूनही करू शकत नाही
आहे याचे कारण सक्षम नेतृत्वाचा अभाव होय. देशाला दूरदृष्टीचा नेता कधी तरी लाभेल
? या अशावादावरच देशातील नैतिक जनता (पण काही कळत नसलेली आम जनता) जगत आहे.
देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर देशाचे अर्थकारण अवलंबून असते. याचे उदाहरण
म्हणजे अमेरिका जोपर्यंत खनिज तेलाच्या संबंधी स्वयंपूर्ण होऊ शकली नाही तोपर्यंत
अरब राष्ट्रांचा जरब त्यांच्यावरही कायमच आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, इराण, इराक यांसारखे मध्यपूर्वेतील देश आर्थिकदृष्ट्या बलवान झाले
आहेत किंवा द. अमेरिकेतील
चिली, पेरू देशांची अर्थ व्यवस्था तांब्यांच्या धातू साठ्यावरच अवलंबून आहे.
त्यामुळे अशा साधनसंपत्तीची मक्तेदारी असणाऱ्या देशांनी तेलाच्या किंमती वाढवल्या
की जागतिक अर्थव्यवस्था कोलमडते. भारतातील याचे ज्वलंत उदाहरण सध्या आपण अनुभवतोच
आहे.
भारताचा इतिहास पहिला तर उत्तर धृवाकडून परकीयांनी येऊन
भारतीय सिंधू खोऱ्यात आपला जम बसविला. कारण सिंधू खोऱ्यात मुबलक नैसर्गिक साधन
संपत्ती होती. आफ्रो-आशियाई देशांतील यूरोपीय वसाहतवादाचे
मूळ केवळ राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यापुरतेच मर्यादित
नव्हते, ब्रिटिशांनी भारतात येऊन साम्राज्य विस्ताराचे धोरण याच
ओढीमुळे सुरु केले होते. मुबलक धातू, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू, मसाल्याचे
पदार्थ, अनुकूल प्रदेश, जंगले, पाणी,
नद्या-सरोवरे या संपन्न प्रदेशावर जागतिक नजरा टिकलेल्या असतात. नाईलच्या खोऱ्यातील प्राचीन ईजिप्शियन संस्कृती त्यामुळेच उदयास आली होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर कब्जा
मिळवून आर्थिक संपन्नता मिळविणे हे मध्यकालीन देशांचे जणू ध्येयच झाले होते.
म्हणूनच वसाहतवाद, साम्राज्यवाद उदयास आला आणि भारताला पारतंत्र्याचे कटू फळे
चाखावी लागली. कारण मौल्यवान सोन्याच्या खाणी ब्रिटिशांनी लुटून नेल्या.
हे सगळे यासाठी सांगणे आहे की आपला देश हा अशा नैसर्गिक
साधन सामुग्रीने संपन्न आहे. देशाने अनेक धोके पचविले आहे. देश संकटात येईपर्यंत
वाट पाहणार आहात का ? यासाठी ग्रेट
ब्रिटनचे उदाहरण आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा अरब राष्ट्र संघटीत झाले व
तेलसाठ्याची मक्तेदारी सांगू लागले तेव्हा अनेक देश त्यांच्या म्हणण्याप्रमाणे
वागू लागले कारण पर्यायाच नव्हता. त्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीलाच दबावाचे साधन
बनविले तेव्हा विकसित व प्रगत युरोपीय राष्ट्रांपुढे इंधनाचे प्रचंड आव्हान उभे
राहिले. आणि वाट्टेल ते होईल या हेतूने आपल्या सर्व क्षमता पणाला लावून
तेलसाठ्यासह इतरही इंधनस्त्रोतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्तर समुद्रात १९७०
साली तेल साठे असल्याचा शोध त्यांना लागला व १९७५ मध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरु
झाले. आणि १९७९ पासून ग्रेट ब्रिटन इंधनाच्या बाबतीत स्वायत्त होईल हा विश्वास
तिथे निर्माण झाला. १९६९
पासून जपानने तेल
उत्पादनासाठी संशोधन सुरू
केले असून ते कोरियन सामुद्रधुनी, जपानी समुद्र व होक्काइडो बेट या क्षेत्रांशी निगडित आहे. रशियाच्या सायबीरियन क्षेत्रात तेलसाठ्यांचा शोध
लावण्याच्या कामी जपान रशियाला सहकार्य देत आहे. याउलट आपल्याकडे नानाविध
भ्रष्ट्राचार होतांना दिसत आहे. यावर भाष्य टाळणेच बरे. त्यासाठी देशातला माणूस
नैतिक होणे अगत्याचे आहे.
असे असले तरी आपल्याकडे असणारे श्रीमंतपण जगाला दाखवून देऊन
स्वयंपूर्ण झाले पाहिजे. देशातील जनतेनेही भावनिक होऊन देशाच्या प्रगतीस मारक ठरेल
व नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होईल असे सण-उत्सव, चंगळवादी समारंभ विज्ञान
युगाच्या काळात हट्ट धरून साजरे करू नये. शासनकर्त्यांनीही त्यासाठी विधायक
गरजांकडे लक्ष पुरवून देशाच्या या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुनियोजित वापर कसा होईल
याचा आधी विचार करून, तशी शैक्षणिक संशोधन केंद्रे उभारून, युवा पिढीला
त्यासंदर्भात जागृत करून, ज्ञानशाखेतून तसेच विद्यापीठीय अभ्यासक्रमात शिकवून,
कोणकोणत्या स्त्रोतांच्या माध्यमात देश स्वायत्त होईल याकडे लक्ष दिले पाहिजे
एवढीच जुजबी अपेक्षा ! . . .
··*··
Comments
Post a Comment