बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
राजगृहाच्या पायरीवर...
ढळू दिला नाही कोपराही
आमंत्रणे भिरकावून बसलो
'हिंदू' कॉलनीच्या गस्तीवर...
बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
हिंदू कोड बिलाच्या पानावर...
शब्दही जीर्ण होऊ दिला नाही
सुधारणा त्यांनी केल्या असतील...
मात्र, पाठांतर आमच्या वस्तीवर
बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
२६, अलीपुर रोडवर...
'आम्ही भारताचे लोक' होऊन
संविधानाचे रक्षक होऊन
अष्टोप्रहर संसदेच्या दारावर
बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
लंडनच्या स्मृतीतील स्थळावर...
आमूलाग्र असेल बदलले जग
कवेलूही बदलू दिला नाही असा
दबदबा निर्माण केला जगावर
बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
नागपूरच्या 'दीक्षाभूमीवर'...
बावीस प्रतिज्ञांचे धडे घेत
दरेकाने दरेकाला दीक्षा देत
लक्ष्य बौद्धमय भारतावर
बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
आम्ही तिथेच आहोत...
आम्ही हललोच नाही...
१९५६ पासून...
- पद्माकर तामगाडगे
Comments
Post a Comment