तृतीयपंथीयांची अवहेलना का ?
डॉ. पद्माकर
तामगाडगे,
तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे
लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे
लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि
पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ?
वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे.
महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक,
षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा,
पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल
गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे
संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास
प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला
समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म्हणून या समाजानेच नव्हे तर ज्याच्या
उदरी ते जन्माला आलेत त्या मातापित्यानेही त्यांना आपले कधी मानून जवळ केले नाही
हीच वास्तविकता आहे.
साधारणत: गर्दीच्या
ठिकाणी, रेल्वेत, लग्न प्रसंगी अशा ठिकाणी गाणे बजावणे करून हे तृतीयपंथी जगात
आहेत. मात्र त्यांना स्वाभिमानाने जगण्याचे एकही साधन या समाजव्यवस्थेने ठेवेले
नाही. खरे पाहू जाता जन्म हा माणसाच्या हाती नसतो की त्याने काय म्हणून आणि कुठे
घ्यावा? एखाद्या मातेच्या उदरी एखादा अधू, अपंग, अंध, बहिरा असा शाररीक विकलांग
असणारे मुल जन्माला येते तसेच लैंगिक
विकलांग असणारेही जन्माला येतात. लैंगिक विकलांगता हे ही शारिरीक
विकालांगातच आहे. म्हणून लैंगिक विकलांग असणाऱ्यांना उपर्निर्दिष्ट हीन शब्दांचा
उच्चार न करता त्यांना ‘लैंगिक विकलांग’ म्हंटल्यास यथोचित होईल. मानवी अर्भकांमध्ये कोट्यावधी जीन असतात.
अर्भकांच्या विकासासोबत त्याच्या अरबो प्रती बनतात. या अत्यंत जटील प्रक्रियेत करोडो
चुका होतात. मात्र या चुकांना सुधारण्यासाठी जीव-रासायनिक प्रक्रिया निसर्गदत्त
असते आणि या करोडो चुकांना पुन्हा सुव्यवस्थित करते. तरीही त्या प्रक्रियेतून
एखाद-दुसरा जीन हा दुरुस्त होत नाही. या कारणामुळे बाळ विकलांग जन्माला येते.
त्यास आपण अपंग किंवा विकलांग म्हणतो. त्यात लैंगिक कमतरता वा बिघाड झाल्यास त्यास
ना पुरुष ना स्त्री म्हणता येत. म्हणजेच लैंगिक विकलांग म्हणावयास हवे. मात्र तसे
न होता त्याला समाजात ‘हिजडा’, ‘छक्का’ ‘षंढ’ अशा नावाने हिणवतात. म्हणून त्यांना
इतर शारिरीक अपंग म्हणूनच पाहायला हवे. त्यासाठी ‘लैंगिक विकलांग’ हा शब्दप्रयोग
करावयास पाहिजे. कारण ही एक जेनेटिक समस्या आहे. भारतात उत्तर भागात याचे प्रमाण
अधिक आहे.
लैंगिक विकलांग असणार्यांचे जीवन अत्यंत हालाकीचे असते अशा
पीडित असणार्यांच्या जीवनाचा पट रणजीत देसाई यांची कन्या पारू नाईक यांनी ‘मी का
नाही’ या कादंबरीच्या रूपाने मंडळी आहे नुकताच या कादंबरीवर आधारित जेष्ठ अभिनेत्री
अलका कुबल यांनी प्रसिद्ध नट मिलिंद गवळी यांच्या सहाय्याने रजत पाटावर आणली.
भारतीय तृतीयपंथांचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या जीवनावर आधारित ही
पटकथा आहे. या उपेक्षितांचे जीवन आता रुपेरी पडद्यावर आणण्याची अनेक सामाजिक
बांधिलकी असणाऱ्यांचे प्रयत्न जोमाने सुरु आहेत.
हे नैसर्गिक लैंगिक विकलांग असणारे आणि भारतीयी समाजव्यवस्थेत
आपले उदरभरण करण्यासाठी स्वत:ला हिजडा संबोधून लैंगिक व्यवसाय करणारे व सोबतच
पारंपरिक जोगतीण, मुरली असणारे असे विविध प्रकार समाजात इतस्त: आपणास वावरतांना
दिसतात. जागतिक पातळीवर पुरुष ‘गे’ म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतांना
दिसत आहेत. अनेकांना शारिरीक बदल घडवून आणावेसे वाटतात. मात्र लिंग परिवर्तन करणे
हे निसर्गाच्या विरोधी आहे. त्याचे शारिरीक धोके आहे. शरीराने पुरुषासारखा दिसणारा
आणि पुरुषी लिंग असणारा मात्र त्याचे सर्व वर्तन स्त्री सारखे करणारा लैंगिक विकलांग नव्हे. तो एक मानसिक आजार आहे. शरीरातील
हार्मोन्स बदलले की त्याला स्त्री सारखे वर्तन करावेसे वाटते आणि मग तो
वेशभूषेपासून सर्वच वर्तन स्त्रीसारखे करू लागतो तज्ञ सांगतात की त्यांच्या
हार्मोन्सचे नियंत्रण केले तर तो पूर्वस्थित येऊ शकतो. नुकताच बॉम्बे हायकोर्टात
२१वर्षीय बिधान बरुआला लिंग बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याला वाटते
की त्याच्या पुरुषी शरीरात एक स्त्री वास करते त्यामुळे त्याला स्त्री होऊन
त्याच्या अभियान्त्रिक असणाऱ्या बॉयफ्रेंडशी लग्न करता येईल. ही आधुनिक पिढी
भावनेच्या आहारी जाऊन कायकाय करेल सांगता येत नाही. त्यावर मानसोपचार तज्ञांचे
उचित मार्गदर्शन घेऊन उपाय करणे येणाऱ्या समाज संरचनेसाठी उचित ठरेल. नाही तर
निसर्गाच्या विरुद्ध आपण असेच वागत राहिलो तर अनर्थ घडू शकेल. काहींना त्यांच्या
शारिरीक रचनेत असलेल्या लिंगाबाबत समस्या निर्माण होतात. अशा व्यक्ती लिंग
बदलासाठी सतत प्रयत्नशील असतात. निर्वाण समुदायातील व्यक्तींचे चिकित्सा करून लिंग
बदल घडवून आणल्याचे उदाहरण आपणास सांगत येईल. आणखी काही पुरुष समलैंगिक संबंध
प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांना तसे आकर्षित करण्यासाठी स्त्रीवेष धारण करतात
त्यांना ड्रॅग क्वीन-साटला कोठीस असे म्हणतात.
पाश्चात्य देशात व विकसित देशातही या लैंगिक विकलांग असणाऱ्या
व्यक्तीस आदरार्थी दर्जा मिळत नाही ओमान मध्ये झेनिथ म्हणजे मधला वर्ग. इस्लामच्या
शिकवणीनुसार त्यांना पुरुषांप्रमाणे सर्व हक्क दिले जातात. मात्र स्त्री किवा
पुरुष यांच्या प्रमाणे त्यांना समान लेखले जात नाही. भारतात तर त्यांना माणूस
म्हणून पहिले जात नाही. दक्षिण भारतात तृतीयपंथी लोकांना ‘अली’ असे नामाभिधान
आहे.त्यांना वेगळा जमातीचा दर्जा दिला आहे. उत्तर भारतात त्यांना ‘हिजडा’ असे
संबोधले जाते. त्यांना स्वतंत्र स्थान असून लग्न किंवा जन्म अशा सोहळ्याच्या वेळीच
फक्त मनाचे स्थान मिळते एरव्ही त्यांचे जीवन जगणेही मुश्कील होते. हिजडयांना
त्यांचे दैवत म्हणून बहुचरा मातेला मन देतात. महाराष्ट्रात ‘रेणुका देवीला’ तो मान
आहे.
मुघल साम्राज्यात हिजड्यांना मानद स्थान होते. स्त्रियांच्या
रक्षण करण्यासाठी मुघल साम्राज्यात ते कार्य करीत असे. झिया जेफरीच्या निदर्शनात
आलेली एक गोष्ट ते नमूद करतात की
हैद्राबाद हे संस्थान होते तेव्हा कित्येक मान्यवरांच्या घरात सेवक म्हणून
‘हिजडे’ सेवेत होते. असे असले तरीही आजचे या लैंगिक विकलांग असणाऱ्यांची गुजराण कशी
होते त्यांचे दैनंदिन जीवन कसे आहे याचा आढावा घेतला तर अत्यंत विषन्न होणारी
परिस्थिती पुढे येते. भारतीय तृतीयपंथी शुभ प्रसंगी आशीर्वाद देऊन मिळणाऱ्या
मानधनातून आपले पोट भरते. रेल्वे, बाजार, गर्दीचे ठिकाण पाहून आपल्या शैलीत टाळ्या
वाजवून भिक मागून आणि अत्यंत अनैसर्गिक शरीर विक्रय करून जीवन जगते. यांना के काम
करून जगण्यास प्रवृत्त कोणी केले ? याचे उत्तर म्हणजे भारतीय समाजव्यवस्था आणि
मानसिकता हेच होय. भारतीय कायद्यात या तृतीयपंथीयांसाठी काही कायदे नसले तरी त्यांना मतदानाचा अधिकार , लग्न करण्याचा
अधिकार आणि स्वत:ची संपत्ती बाळगण्याचा, मिळविण्याचा अधिकार सामान्य माणसाप्रमाणेच
दिला आहे. भारतीय मानसिकते नुसार एखादी लैंगिक विकलांग मुल जन्माला आले की त्याच्या आई-वडिलांना समाजात जगणे मुश्कील होते
त्यामुळे त्या पोटाच्या गोळ्याला ते अव्हेरून स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा जपतात
यातही अपवाद आहे. तो म्हणजे लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचे देता येईल. साधन असणारे
त्रिपाठी कुटुंबाने लैंगिक विकालांगत्व स्वीकारून जसे आहे तसे स्वीकारून सामान्य
मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. ही उदारता प्रत्येकच आई-वडिलांमध्ये उत्पन्न
झाल्यास त्यांच्या गुणांचा विकास नक्कीच होईल. भारतात त्यांना असमान व हीन
मानसिकतेमुळे आरोग्य, शिक्षण आणि रोजगार मिळविणे शक्य नसते. भारतीय दंड विधान कलम
३७७ नुसार असा कोणताही संभोग जो स्त्री आणि पुरुष दोघांव्यतिरिक्त असेल तो दंडनीय
गुन्हा आहे. हा कायदा १९६० साली ब्रिटिशांनी अमलात आणला होता.
लैंगिक विकलांग असणाऱ्या आणि सामान्य माणसांच्या कार्यशैलीत
फारसा फरक नसतो. जे कलाम एक पुरुष व स्त्री करू शकते तेच काम हे लैंगिक विकलांग
असणाऱ्या व्यक्तीही करू शकतात. मात्र समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांची अवहेलना
केली जाते त्यामुळे त्यापासून ते वंचित राहतात. तरीही हे सगळं सहन करून अनेक जन
आता मुख्य प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. अशाच एका लैंगिक विकलांग
असणाऱ्याची गाथा उत्तर प्रदेशातील चांदोली जिल्यात एक तृतीयपंथी शिक्षिका म्हणून
विद्यार्थीप्रिय आहे. ३५ वर्ष असणारी स्वत:चे नाव लता सांगते. सर्वसामान्य
शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. तिच्या प्रेमळ, निर्मल
स्वभामुळे मुलांची ती आवडती लतादीदी झाली आहे. १२ वी पर्यंत चांगल्या गुणांनी
शिक्षण तिने घेतले आहे. तसेच ३९ वर्षीय विद्याने हॉटेल मॅनेजमेंटची उच्च पदवी
घेतली आहे . फामिला ही एका स्वयंसेवी संस्थेच सेविका आहे. तृतीयपंथियांसाठी उत्सव
आयोजन ती दरवर्षी करीत असते. संध्या नामक तृतीयपंथी सांगते की कोलकात्यात आपल्या
कुटुंबासमवेत ती ताहते दोन भाऊ व तीन बहिणी असे तिचे कुटुंब आहे. तिचे गीरीया नामक
व्यक्तीशी लग्न झाले असून वैवाहिक जीवन सुरळीत आहे. मुंबईमध्ये लैंगिक विकलांग
असणाऱ्यांची सौंदर्य स्पर्धा घेतली होती. त्यात बॉबी लईशराम, राणी बोतारा, रितू
बावडी अर्पण बॅनर्जी यांच्या कडे पाहून कुणालाही ते तृतीयपंथी आहेत अशी शंकासुद्धा
येणार नाही
अशा स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या तृतीयपंथियांना समाजाच्या
मुख्य धारेत स्थान नाकारण्याचे कुणीही नाकारणार नाही मात्र तशी सामाजिक मानसिकता
तयार करणे गरजेचे आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर. . . हा एक क्षण विचार केल्यास
त्यांच्या व्यथांचा केवळ अंदाज बंधने आपणास शक्य होईल.
तृतीयपंथीयांचा मुख्य धंदा कोणता? तर देहविक्रय भारतातील
चेन्नई, मुंबई, पुणे बेंगलोर इ. ठिकाणी खूप चालतो. गुड मैथुन व मुख मैथुन
केल्यामुळे त्यांच्यात HIV ग्रस्तांचे प्रमाण खूप आहे. ‘हमसफर ट्रस्ट पुरुष वेश्यांवर संशोधन करत
आहे. त्यांनी एका शिबिरात ७६ उपस्थितांपैकी २४ पुरुष व ५२ तृतीयपंथीयांची HIV चाचणी घेतली त्यात त्यांना ५२ तृतीयपंथीयांपैकी ४० लोक HIV ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले तर ३० टक्के तृतीयपंथीयांना लैंगिक आजार
होते. याचे कारण असे आहे की त्यांना आरोग्याबाबत ज्ञान नाही आहे. शिक्षणाचा अभाव
आहे. समाजाची अवहेलना असल्यामुळे जगण्याचे पर्याप्त मार्ग त्यांच्याजवळ नाही आहेत.
वैयक्तिक हक्कांची माहित नाहीं आहे. याला कारणीभूत समाजाची असणारी संकुचित
मानसिकता हीच आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षण, रोजगार दिला तर
त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळेल.
मानवी मुलभूत हक्कानुसार, समानतेच्या तत्त्वानुसार तृतीय
पंथीयांना देखील व्यक्ती म्हणून समाजाने स्वीकारले पाहिजे. न्यायालय जसे लिंगभेद
करीत नाही तसे समाजानेही करू नये. प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे.
न्यायापुढे सर्व व्यक्ती समान आहेत मग तृतीयपंथीयांनाच तो न्याय का दिल्या जात
नाही याचा सर्व व्यक्तींनी विचार करणे गरजेचे आहे. लैंगिक विकलांग असणाऱ्या
व्यक्तींना स्वाभिमानाने जगता यावे याकरिता समाजातून प्रबोधन व्हायला पाहिजे
जेणेकरून त्यांच्याबद्दलची हीनता पुसून त्यांच्याकडे सामान्य व्यक्ती म्हणून पाहता
येईल. त्यासाठी त्यांचे अज्ञान, शरीरविक्रय, अंधश्रद्धा यांपासून त्यांची सुटका
आणि सरकारी, खाजगी क्षेत्रात त्यांना सन्मानाने सामावून घेतले पाहिजे. राजकीय,
आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात सहभाग घेऊन त्या त्या ठिकाणी आपल्या कार्यक्षमतेची
चुणूक दाखविणे गरजेचे आहे त्यासाठी संसदेत त्यांना संधी देणारे विधेयक पारित केले
पाहिजे. स्वत:चे कुटुंब व जीवन व्यतीत करण्याचा हक्क त्यातून त्यांना मिळाला
पाहिजे. यासाठी अनेक समाजसेवी संस्था आज कार्यरत आहे त्यांचा नामोल्लेख करणे माझे
कर्तव्य आहे. त्यात ‘आशिया पॅसेफिक नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स’ तृतीयपंथीयांच्या
सुरक्षित जीवनासाठी कार्य करते. ‘हमसफर ट्रस्ट’ आणि ‘सहार’ ही मुंबई, दिल्ली,
हैद्राबाद आणि मणिपूर इथे कार्यरत आहे. HIV ग्रस्थांच्या व व्यसनविरोधी भूमिकेसंबंधी कार्यरत आहे. त्यांच्या
कार्याला व तृतीयपंथियांच्या जीवनाला माणूस म्हणून समाजाने स्वीकारावे हीच
सदिच्छा.
· · * · ·
Comments
Post a Comment