Skip to main content

प्राक्तन बांडगुळांचं


प्राक्तन बांडगुळांचं

परंपरेच्या नांगराने आमची लुसलुशीत
जमिन खणून त्यांनी विध्वंसाचे सुरंग पेरले
सातासमुद्रापल्याडून येऊन घरभेद्यांनी
इसवी सनापूर्वीच रक्तलांच्छित स्फोट केले.
गावकुसाचे हे बांडगूळ वर्णाश्रमाचे निर्माते झाले
आमच्या आयुष्याच्या चिंधड्या वेशीवर टांगून
शतकानुतके छळत राहिले.
वारेमाप साधनांना हिरावून
यांनी आम्हालाच गुलाम केले.
शतकांचा अंधार फोडून सूर्यकुळाचा उदय झाला
अंधारलेल्या क्षितिजांच्या
नसानसांतून प्रकाशाचे रक्त वाहिले
अज्ञानाचा रक्तपिळ सोडवून शरीरभर सळसळल्या
तेव्हा, त्यांच्या नांगराचा फाळ वाकून बेकाम झाला.
कैवल्यवाद, साक्षात्कार,
 विवर्त, जन्म-मरणाचे फेरे सुटले
प्रत्युत्य-समुत्पादाचे जणू वादळच उठले.
यांचा काळा कृष्ण अन भू रामाचे बिंग फुटले
तेव्हा `तत्त्वमसि' लाही आदर्शवादातच गुंफले
 तेव्हापासून...
यांचे डोके हागणदारीच्या पांदणीला टांगले
यांच्या गीतेला दरवेळी नवे चमत्कारिक अर्थ फुटले
कधी शंकराचार्य, कधी ज्ञानोबा तर कधी टिळक
यांचे `सन्यास, चिद्विलास की कर्म'
 एकाचे  उत्तर एका न ये!
यांचे लबाड लचके थंडगार गोळ्यांनी सहन केले
यांचे अगणित वदतोव्याघात आम्ही पोटी घातले.
तेव्हा विज्ञानवादी बुध्दही यांनी अवतारी केला
यांच्या प्रक्षिप्त विधानांची माय कोणत्या योनिची रे!
युगे लोटली सूर्यकूलाचा जनाधार लोपला
तसा यांचा रोमन क्रिडा पुन्हा वळवळला
योगसूत्राचे प्रक्षिप्त बाळकडू आमच्या गळी उतरविले
बुध्दाचे तत्त्व चौर्यप्रदाने यांनीच मिरविले.
अरण्यवासींच्या हालांचे हेच शिलेदार होत
कवनांच्या कवटीत गुंफुन त्यांचे उदात्तिकरण केले
कधी कालीया नाग, कधी पुतना, एकलव्य मारीले
आणि मूलनिवाश्यांचे हे बांडगूळं भू-देव झाले
 या भूमीत बुध्दाच्या धम्माचे तत्त्व कणाकणात मुरले
मातीचा वसा तुटणार तरी कसा
त्यांच्या नागार्जूनाने इथे महायान- हीनयान...
बोधिसत्त्व अन् जातकांचे हळुवार विष पेरले
त्यांच्या कफल्लक शुंग घराण्याने वामाचार केला
महाबलाधिकृत अशोकाच्या
 साम्राज्यालाच तडा दिला
पुष्यमित्राकरवी बृहद्रथ सम्राटाचाही घात केला
 भिक्खुंच्या शिरकाणाचा अमानुष खेळ केला
 तरीही परधार्जिन्यांनो!
आमच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा बाणा आहे
बुध्दाच्या अनुशासनाच्या रंध्रारंध्रात खुणा आहे
विज्ञानाची परम पातळी तपासण्याची मुभा आहे
तुमच्यासह मुक्या पाण्यांनाही
 जगविण्याचा मनसुबा आहे
म्हणूनच...
एकविसाव्या शतकाची सूर्यकुलाची सोनेरी पहाट
ब्राह्मण्याला हादरवणारी, माणूसकी जागवणारी आहे
`बहुजन हिताय, बहुजन सुखाय्'
 म्हणत पेटवणारी आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचं तुमचं प्राक्तन आहे
                                                                    
                     ------"ग्लासनोस्त" काव्यसंग्रहातून. . .
- पद्माकर तामगाडगे

Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...