Skip to main content

बोलणा-या निखा-यांची कविता : ग्लासनोस्त डॉ. यशवंत मनोहर


बोलणा-या निखा-यांची कविता : ग्लासनोस्त
डॉ. यशवंत मनोहर

कवी पद्माकर तामगाडगे यांच्या 'ग्लासनोस्त' या कवितासंग्रहातील कविता वाचकाला अनेक पातळ्यांवर अंतर्मुख करणा-या आहेत. भोवतीच्या समाजवास्तवाला अनंत भीषण प्रश्नांची आग लागली आहे. खूप लोक अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मुलभूत गरजांची परिपूर्ती होत नसल्याने अगतिक झालेले आहेत. यात शहरांमधील गरिबांचा जसा अंतर्भाव होतो तसा ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावरील सर्वहारांचाही अंतर्भाव होतो. ही पिळवणूक मागील हजारो वर्षांपासून वंचितांच्या वाट्याला आलेली आहे. या पिळवणुकीला आज नवनवे आयाम प्राप्त होत आहेत आणि नवनव्या गनिमी तंत्राची जोडही तिला लाभत आहे. शोषणाची इतकी तरल शैली आज वापरली जाते की मेलेल्यांनाही त्यांच्या मरणाचा थांगपत्ता लागत नाही.

बहिष्कृतांच्या स्वाभिमानाची एक मूलगामी चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारली. त्या चळवळीमुळे भारतीय समाजाचे हजारो वर्षे लुळे पडलेले शरीर अपूर्व जिवंतपणाने  मोहरून आले. मुक्यांना विद्रोही जिभा लाभल्या. १९५६ नंतर स्वाभिमानाचा एक नवा ज्वलंत आविष्कार या युगाने पाहिला. प्रत्यक्ष जीवनातल्या या स्वाभिमानावर प्रत्यक्ष माणुसकीही फिदा झाली. आणि त्याच्या वाड्.मयीन पराक्रमावर संपूर्ण जगानेच गौरवाची फुले उधळली. हा वाड्.मयीन पराक्रम १९५६ नंतरच्या मराठी साहित्याच्या रणभूमीवर प्रथम साकार झाला. ही रणभूमी अजून शांत झाली नाही. खूप प्रतिभांना आजही क्रांतीशी बोलता येते. खूप प्रतिभा आजही परिवर्तनाचा गौरव करीत आहेत आणि परिवर्तनाच्या मार्गावरील संकटांशी भांडतही आहेत. पद्माकर तामगाडगेंची  प्रतिभा या प्रतिभांमधली एक महत्वाची प्रतिभा आहे. 'ग्लासनोस्त' या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी कवी पद्माकर तामगाडगे यांचे मनापासून अभिनंदन करतो.

पद्माकर तामगाडगे यांच्या कवितेत मला विशेषत्वाने जाणवली ती त्यांची जीवनदृष्टी ! ही जीवनदृष्टी धार्मिक नाही तर ती धर्मातीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली ही धर्मातीत जीवनशैली बुद्धानंतर पुन्हा प्रस्थापित केली. भारतीय संविधानातही तिचा सम्यक आशय आहे आणि माणसाचे संपूर्ण ऐहिक कल्याण हा तिचा विषय आहे. 'काही प्रश्न' या कवितेत कवीने निर्माण केलेल्या प्रश्नांमधून त्याची जीवनदृष्टी आपल्यापुढे पारदर्शक रूपात उभी राहते. याच कवितेच्या उत्तरार्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मातीततेच्या बुलंद दीपस्तंभाकडे पाठ फिरवून गतकालीन सवयींचे ऐकत लोक धर्मांच्या दलदलीकडे निघालेले आहेत याचे दुःख उपरोधिक पद्धतीने व्यक्त केले आहे. हे अधःपतनशील स्थित्यंतर मागल्या ४०-५० वर्षातच स्पष्ट झालेले आहे. गुलामी लादणारांचा दुष्टपणा समजावून घेणे सोपे असते पण गुलामीवर प्रेम करणारांचा मूर्खपणा समजावून घेणे केव्हाही अवघडच असते. कोणीही गुलाम करीत नसतानाही स्वतःच गुलाम होणारी माणसे हा खुद्द स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या मूल्यांनाही बिकट पेच वाटत असतो. अशा स्वयंसर्जित गुलामांची, अशा स्वतःसिद्ध लाचारांची संख्या आज वाढत आहे याची जिवंत यातना या कवितासंग्रहाच्या अंग प्रत्यंगातून वाहत आहे हे मला प्रकर्षाने जाणवले.

पद्माकर तामगाडगे हे नव्या पिढीचे शिलेदार कवी आहेतया संपूर्ण पिढीला जाळत सुटलेल्या  प्रश्नांशी कवी भांडतो आहे. हे भांडण त्यांच्या कवितेतील शब्दाशब्दातून पेटले आहे याचा अनुभव आपल्याला येतो. आजचे वास्तव कवीला गोंधळगर्दीसारखे वाटते. या गोंधळगर्दीचे उगम जाळून टाकायला हवेत हे प्रखरपणे कवीने इथे मांडलेले आहे. हे कार्य ज्यांच्या डोक्यात बुद्धिवाद सळसळतो आहे ते तरुण विचारांचे तरुणच करू शकतात असे कवीला वाटते. क्रांतीचे हिरवेकंच निखारे डोक्यात  वागविणा-या तरुणांनी प्रतिक्रांतीच्या महासभेत शिरू नये असे 'हेच ते सत्य' या कवितेत कवीने सांगितले आहे.

या संपूर्ण कवितासंग्रहात आपल्या युगाला नवा आशय देण्याची, मानवी जीवनाला नवी जीवनशैली देण्याची आणि वैश्विक माणुसकीची नव्याने सर्जना करण्याची उत्कट तहान दाटलेली आहे.

या कवितासंग्रहात तडफडणारा आणखी एक प्रश्न आपले चित्त वेधून घेतो. तो प्रश्न आहे लोकांना अनुचित, अहितकारक आणि असभ्य गोष्टींबद्दल असलेल्या आसक्तीचा ! याला कारण आहेत सवयी. या सवयी भावनिक आहेत. त्याच त्या विचारांची विघातक ओझी वाहण्याच्या आहेत. परस्परांमधील दुरावे आणि दुष्टावे जपण्याच्या आहेत. माणसे या सवयींच्या पुरात वाहत आहेत. यांना वाहत ठेवणे ही पुराची इच्छा नाही पण वाहत राहणे ही उत्कट सदिच्छा माणसांचीच आहे. या सर्व आशयाचा आवाका

"भीमराया तुझ्या मताचा
जर देश घडविला असता
देशाचा कणकण इथला
हा प्रबुद्ध बनला असता."

या आटोपशीर चार चरणामध्ये कवीने मांडलेले आहे. त्यातून त्याच्या यातनांचे तळघर आपल्यापुढे उघडले जाते. सर्वत्र 'गोंधळ-गडबड' आहे. कोणी कोणाचे ऐकत नाही. ही वैचारिक अराजकाचीच मुजोरी होय असे म्हणता येईल. एकूणच समाजातील लोकांची मानसिकता अशी विलक्षण की लोक भूतकाळात तरी विसाव्याला जातात किंवा उद्याच्या स्वप्नात तरी तरंगत राहतात. या सर्व लपाछपीत लोकांचा वर्तमान काळच हरपून जातो. या सर्व प्रक्रियेत जगण्याच्या प्रक्रियेलाच जगणे म्हणण्याची सवय माणसांना जडून जाते. आणि मग केवळच थोड्या लोकांची नव्हे तर एकूणच सर्व लोकांची शेती बंजर होऊन जातेअनेक सुविधांमुळे अनेकांच्या रक्ताच्या पेशी पांढ-या होतात. माणसे पांढरपेशी होतात. मानवी उर्जाच मग वांझ होऊन जाते.       या         पांढरपेशांसोबतच कवीने सुखवस्तू नेतृत्वावरलाचार मनांवर उपरोधाची धार धरली आहे. पण हे सर्व बदलावे हाच ध्यास कवीला लागलेला आहेमाणसाने मातीशीच नाते जोडावे. हे नाते समृद्ध करीत  न्यावेकोणत्याही चौकटीत मावणार नाही असे स्वतःचे निर्माण करावेही मानवाच्या अस्तित्वाची  असीमता  या कवितासंग्रहात मांडली गेली आहे. ती मला अत्यंत मोलाची वाटते. कवीला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा !

डॉयशवंत मनोहरनागपूर.
दि२३-११-२०११  

Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...