Skip to main content

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२




स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२

- डॉ. पद्माकर तामगाडगे

      भांडण घरातील असोत किंवा राष्ट्रांची संहार, विनाश, अशांती होणारच. भांडणामुळे आपला प्रतिस्पर्धी व आपण स्वत:ही सुखी होत नाही. त्यात दोघांचेही नुकसानच आहे. म्हणूनच जगाला भारतातून शांतीची शिकवण देणारा बुद्ध आज सर्व राष्ट्रांना हवाहवासा वाटतो. कारण शांतीचे साम्राज्य येईल तेव्हाच सुख, समृद्धी आणि विकास सुद्धा साधने शक्य होते. आपल्या जीवनाच्या ऐन उमेदीत रोहिणी नदीचा वाद गौतमाने मोठ्या चातुर्याने सोडविला तो मध्यममार्ग जगाला आजही तितकाच पोषक आहे. मात्र याचा अर्थ असा घेऊ नये की समस्येला घाबरून ही सोईस्कर पळवाट आहे. शांती हे तत्व बुद्धाने माणसांच्या हितासाठी, त्याच्या सर्व सुखासाठी सांगितलेला आहे. त्यात वैश्विकता आहे. प्रत्येक जीवाचं रक्षण आहे. जगण्यासाठी सोईस्कर असा धम्माचा तो मार्ग आहे. म्हणून विश्वशांतीचा प्रणेता बुद्ध महान आहे.
          २० ऑक्टोबर १९६२  ला भारत-चीन युद्धाचा प्रारंभ झाला आणि सलग एक महिना ते सुरु राहिले. २० ऑक्टोबर २०१२ ला  या घटनेला ५० वर्षे पूर्ण झालीत. तसे चीन हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे. म्हणजे ते शांतीप्रिय आहे. तरीसुद्धा त्यांनी भारतासारख्या राष्ट्रावर आक्रमण करावे हे बिंग ५० वर्षात सुटले नाही. आणि सशक्त असणाऱ्या भारताला त्यांनी पराभूत करावे हे ही तितकेच आश्चर्याचे आहे. या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेतला तर काही सूत्र हाती लागतात. ५० वर्षाच्या कालखंडात अजूनही भारत चीन चे संबंध मैत्रीपूर्ण, सौहार्द्रपूर्ण आहेत काय? की भविष्यात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे चिन्ह दिसत आहेत. सध्या चीन हा महासत्ता असणाऱ्या देशांच्या रांगेत मुसंडी मारण्याच्या बेतात आहे. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या या देशाच्या महत्वाकांक्षा जोमाने दिवसेंदिवस वाढतच आहे. साम्यवादाने पछाडलेला मात्र जागतिकीकरणाच्या काळात भांडवलवादाला सोयीस्कर आपलेसे करून घेऊन. देशोविदेशाच्या बाजारपेठा काबीज करणारा चीन आजचा आहे.
          भारतावर चीनचे आक्रमण झाले त्यावेळी देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. एक महिना देशावर युद्ध चालू असतांना देशाच्या जनतेला दिलासा देण्यासाठी जवाहरलाल नेहरूंना वेळच मिळाला नाही. या एका महिन्यात त्यांनी देशाच्या जनतेस केवळ युद्धाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबरला संबोधित केले. देशाचे पंतप्रधान म्हणून देशबांधवांचे मनोधैर्य वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र लढाई सुरु होण्या आधीच अत्यंत नैराश्यपूर्ण प्रतिपादन त्या भाषणातून नेहरूंनी केले.  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा इंग्लंडला जर्मनीसारख्या राष्ट्राकडून अनेक हल्ले पचवावे लागले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी राष्ट्राला प्रचंड जोश निर्माण होणारे भाषण केले, ‘आम्ही कोणत्याही परीस्थितीत देशाची सुरक्षा करू. मग ते समुद्रांच्या किनाऱ्यावर असो, जमिनीवर व रस्त्यावर असो आम्ही लढणार आहोत. आम्ही पहाडांवर जाऊन लढू मात्र शस्त्र खाली ठेवणार नाही.’  या भाषणातून देशवासियांना जी उर्जा लढण्याची मिळाली त्या उर्जेने हिटलरसारख्या निर्दय शासकाचेही शस्त्र टिकू शकले नाही. किमान हीच अपेक्षा भारतीयांची नेहरूंकडून त्या वेळेस होती मात्र नेहरूंचे अत्यंत निरुत्साही भाषण झाले. देशाच्या सरहद्दीवर असणाऱ्या आसाम वासियांना धीर देणारा कुणी वालीच या प्रसंगी उरलेला नव्हता. या भाषणानंतर नेहरू एक महिन्यानंतर देशांच्या जनतेसमोर आले. तेही अत्यंत दुखद बातमी घेऊन. २० नोव्हेंबरला त्यांनी आपली हार मान्यच केली होती. देशाला आता अशा संकटांची सवय करून घेतली पाहिजे. युद्धप्रांतातून येत असलेल्या बातम्या फारशा सुखद नाहीत. चीन हा दुटप्पी भूमिकेची नीती खेळत आहे. एका बाजूला चीन शांतीच्या गोष्टी करतो तर दुसऱ्या बाजूला देशावरचे हल्ले सुरूच आहेत. यावेळी वालौंग, सिला आणि बोमडीला इथे भारतीय सैनिकांचा पराजय झाला हे नेहरुने मान्य केलेच होते.
          वास्तवात नेहरू सरकार चीनच्या संदर्भात गंभीर नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र राजकीय उलाढाली इतक्या होत्या की त्याची नाळ पकडणे नेहरुलाही शक्य झाले नाही. आणि अनेक चुकीचे पावले पडत गेली की ज्या चुका सुधारणे शक्य झाले नाही. नेहरूंचे आत्मचरित्र लिहिणारे एस. गोपाल या संदर्भात लिहितात, काही गोष्टी इतक्या भयानक चुकीच्या घडल्या होत्या की आज असे घडले नसते तर कुणाचा विश्वासदेखील बसला नसता. मात्र या गंभीर चुका नेहरू सरकारकडून घडून गेल्या होत्या. यावर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सरकारने चीनवर सहज विश्वास ठेवला आणि वास्तवतेकडे कानाडोळा केल्याचा गंभीर आरोप केला. नेहरू सरकारचा गुन्हा म्हणजे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन की जे १९५७ पासूनच संरक्षण मंत्री होते. त्यांची कृपादृष्टी असणारे व युद्धाची धुरा सांभाळायला नेहरू सरकारने परवानगी दिलेले लेफ्टनंट जनरल बी.एम.कौल. कौल यांना संरक्षण मंत्र्याच्या मोहाने पूर्वोत्तर युद्ध प्रभावित क्षेत्राचा कमांडर बनविले. कौल एक प्रथम दर्जाचे सैनिकी नोकरशाह होते. सोबतच ते प्रचंड स्फूर्तीदायक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांचा जोश त्यांच्या महात्वाकांक्षेमुळे अधिकच वाढला होता मात्र त्यांना युद्धाचा कोणताही अनुभव नव्हता. तरी सुद्धा कृष्ण मेनन यांनी त्यांची नियुक्ती करून गंभीर चूक करून घेतली आणि नेहरू यांनी डोळेझाकपणे या नियुक्तीला मान्यता दिली.   चीन भारतावर आक्रमण करणारच नाही अशा अविर्भावात नेहरू होते. भारत-चीन सीमेवर आधीपासूनच संघर्ष सुरु होता.  मात्र तो हिंसक नव्हता नोव्हेंबर १९५९ मध्ये त्याला हिंसक वळण लागले. कोंगकाला या लडाख मधील ठिकाणी पहिल्यांदा रक्तपात झाला. या नंतर अनेक चुकीचे निर्णय होत गेले. त्यासाठी देशाचे सूत्र सांभाळणारे पंतप्रधान यांनाच जबाबदार धरावे लागेल. त्याचबरोबर अधिकारी, सल्लागार मंडळ आणि सेनादल हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. यापैकी कुणीही नेहरूंना सांगण्याची हिम्मत दाखविली नाही की वर्तमानस्थिती काय आहे. कमांडर कौल हे अतिशय अपमानजनक वागणूक आपल्या सेना प्रमुखांना देत असत. त्यामुळे के एस थिमैया यांच्याशी बाचाबाची होऊन शिगेला पोहचली. त्यात त्याने राजीनामा दिला मात्र राजीनामा देऊ नये म्हणून त्यांना मनविण्यात आले. तेव्हापासून तर सेना मेननच्या हुकमाची गुलाम झाली. जेव्हा कौल हिमालयाच्या उंच प्रदेशात आजारी पडला तेव्हा त्याला दिल्लीला शुश्रुसेसाठी आणण्यात आले आणि युद्धाचे सर्व प्रतिनिधित्व मेनन यांनी दिल्लीच्या मोतीलाल नेहरू मार्ग इथल्या घरूनच सांभाळले. ह्या सगळ्या चुका संसदेत नंतर उमटल्या मात्र वेळ निघून गेला होता. देशभर सर्वत्र संरक्षण मंत्री मेनन आणि कमांडर कौल यांच्याबद्दल असंतोषाची भावना होती. तत्कालीन मंत्रिमंडळात नेहरू कठपुतली सारखे झाले होते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी केवळ विशिष्ठ लोकांचेच प्राबल्य होते. त्यात मेनन आणि कौल यांच्या बरोबर परराष्ट्र मंत्री एम. जे. देसाई, गुप्तचर खाते बी.एन. मलिक, संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव एच. सी. सरीन हेच देशाची नीती निर्धारित करीत असत. या सगळ्या गोंधळाचा फायदा माओ सरकारने उचलला आणि सोवियत संघाच्या शत्रुत्वाकडे भारताने दुर्लक्ष केले. क्युबाच्या मिसाईल संकटाच्या वर्तेचा कुशलतापूर्वक माओने उपयोग करून नीती ठरविली. या नीतीपासून गुप्तचर खाते अंधारातच राहिले परिणामत: चीनला हल्ला करून भारतावर विजय मिळवणे सहज शक्य झाले.
          ही १९६२ सालची नेहरू सरकारची अनागोंदी २०१२ च्या मनमोहन सरकारच्याही काळात अजूनही अतिविदाराकच आहे. चीन शांततावादी असला तरी महत्वाकांक्षी आहे. म्हणून हळूहळू  भारताच्या भूखंडावर आपला हक्क सांगण्याचे धाडस तो करीत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती घडणारच नाही असे आत्मविश्वासाने कोणत्याही भारतीयांना सांगता येत नाही. ही अराजकता व्यक्तिवादी राजकारणामुळे निर्माण होते. भारतात विभूतीला महत्व अधिक व राष्ट्राला कमी त्यामुळे राष्ट्रीय भावना बोथट होत आहेत. नुकताच गांधी यांना राष्ट्रपिता पदवी कुणी बहाल केली? हा प्रश्न प्रसारमाध्यमांमधून गाजला. तिथे अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. देशाच्या संविधानात दुरुस्ती करून गांधींना राष्ट्रपिता हा पुरस्कार द्यावा का? या वादात अनेक तथाकथित गांधीवाद्यांनी संविधानापेक्षा गांधी मोठे आहे असे म्हणून अकलेचे तारे तोडले. ही वर्तमान राजकारणाची व समाजकारणाची स्थिती देशाला कुठे नेईल. पुन्हा तोच इतिहास घडविणार आहात काय? चीनने भारतावर आक्रमण करायचे ठरविले तर तुमच्याकडे क्षमता आहे का त्यांना अडविण्याची? चीनी सैनिकांप्रमाणे आमच्या सैनिकांना योग्य प्रशिक्षण व सुविधा देतात का?  चीनी सैनिकांकडे असणारे रसद, दारुगोळा अत्याधुनिक शस्त्र भारतीय सैनिकांना देश पुरवतो का? लढाईत पाहिजे असणारी क्रूरता आणि युद्धाचे परिपूर्ण कसब की जे शस्त्राविनाही लढता येईल  असे तंत्र भारतीय सैनिकांना अवगत करून दिले आहेत काय? चीनी सैनिकांना प्रसंगी विना शस्त्रानेही लढता येते. कारण त्यांना कुंगफूचा वापर करता येतो. कोणत्याही वस्तूंचा अवजार म्हणून वापर करता येतो. पोट भरण्यासाठी नैसर्गिक साधनांचा प्रसंगानुरूप वापर ते करतात. हे भारतीय सैनिकांना साधेल काय? चीनी सेनेत ‘मंगोल’ सैनिक आहेत. की जे जगातील सगळ्यात क्रूर आणि खुंखार म्हणून ओळखले जातात. जेव्हा भारतावर नादीरशहा आणि चांगेज खान यांच्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा तिथे मंगोल सैनिक होते. त्यांच्यासारखे खुंखार सैनिक तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्र भारतात आहे?
          ही वरील वास्तवता लक्षात घेतली तर आपण पोकळ वासा घेऊन स्वत:चे सांत्वन करीत, पोकळ राष्ट्राभिमान घेऊन जगत, स्वत:लाच फसवत आहोत हे लक्षात येईल. म्हणून देशाचे राजकारण व्यक्तीनिष्ठ, विभूतीपूजक न होता. ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीयच आहे.’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व अंगिकारले पाहिजे. संसदेचा गाडा चालवणाऱ्यांनी देशाचा, राष्ट्राचा विचार केला तर कोणत्याही राष्ट्राची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होणार नाही. आम्हालाही युद्ध नकोच आहे. परंतु युद्धाची संधी आपल्या गलथानपणामुळे आपण ओढवून घेतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वचक निर्माण करण्यात आपण आजवर कमी पडलो. यात सर्वस्वी आपले राजकारण, इथला विषमतावाद, जातीयता कारणीभूत आहे. म्हणून पाकिस्तान सारखा लहानसा देशही भारताला जुमानत नाही. आम्ही दुबळे नाही तसेच आम्ही एकसंघही नाही हीच वास्तवता आहे.
· · * · ·

Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...