Skip to main content

पानीपतचा पुन:प्रत्यय : `ऐसे वर्तमान'

पानीपतचा पुन:प्रत्यय : `ऐसे वर्तमान'

मराठी नाट्यचळवळ सद्या हलक्या-फुलक्या विनोदी नाटककारांच्या गर्दीच्या प्रेक्षकांना ओढून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच नुकताच `ऐसे वर्तमान' सारखे ऐतिहासिक, परंतु स्वतचं वेगळेपण घेऊन येणारे नाटक रंगमंचावर आले. 14 जाने. 1761ही काळाची नोंद कधी न मिटणारी आहे. `पानीपता'वर हजारो माणसांच्या रक्ताचा सडा पडला. तिथे अनेक शूरविरांना वीरगती मरण प्राप्त झाले. भाऊसाहेबांपासून अनेक थोरामोठ्यांनी प्राणपणाने झुंज दिली. त्यातील मोजक्याच म्हणजे विश्वासराव, दत्ताजी, जनकोजी शिंदे, मल्हारराव, मेहंदळे, पुरंदरे इ. नावेच फक्त इतिहासाला ज्ञात आहे. इतिहासाने आमच्यापर्यंत हीच शूरांची नावे पोहचविली. परंतु सैन्याच्या सर्व गरजा पुरविणाऱया बारा बलुतेदारांना त्यात स्थान कुठे आहे?  त्यांचाही या लढवय्यांच्या शौर्या इतकाच वाटा आहे. तरीही त्यांचा साधा नामोल्लेख आढळत नाही. इथल्या समाजव्यवस्थेने इतरांना शस्त्र धरण्यास बंदी केली; म्हणून काय बहुजनांतील एकलव्यांच्या गुणांना, कौशल्यांना दाबून ठेवता येईल काय? इथल्या शूर मर्दांच्या रक्तातच असलेल्या वीररसाचा इच्छित प्रसंगी ते वापर करतात. याला इतिहास साक्षी आहे. हाच सूर घेऊन नाट्यसंहितेच्या पार्श्वभूमीवर नव्यानेच लिहिणारे बबन शिंदे यांनी `ऐसे वर्तमान'मध्ये नायक म्हणून जातीने न्हावी असलेल्या उमद्या तरुणाला नायकत्व बहाल केले. त्यासाठी लेखकाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. सोन्या पाटील,  एस.के. गुप निर्मित असलेले व सुनील परब यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना वेगळी व सुखकारक अनुभूती देऊन गेले. `पानीपत'च्या 250 वर्षांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले हे नाटक गतकाळच्या समाजव्यवस्थेवरील सदोशतेवर नकळतपणे अंतर्मुख होण्यास भाग पाडते. वर्णाश्रमाची उतरंड व माणसांचे कर्तृत्व, जात, धर्म आणि त्यांचा जन्म या गोष्टींचा तीळमात्र सहसंबंध नाही. याचा पुनप्रत्यय `ऐसे वर्तमान'मधून आस्वादकांना मिळतो.`ऐसे वर्तमान' या नाटकाचा नायक हा एका न्हाव्याचा मुलगा आहे. `मुकिंदा' (प्रदीप सरवदे) आपल्या वृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचं नुकतचं लग्न होऊन नववधूच्या अंगावरची हळदही उतरायची आहे. अशातच लष्करात जाण्याचं तो मनोमन ठरवून टाकतो. बलुत्याच्या पिढीजात धंद्यांवर पोटं जगविता येते पण स्वत्त्व, स्वाभिमान हिरावून गुलामगिरीच्या गर्तेत पिढ्या नासून जातात. त्यामुळे लष्करात जाऊन भाऊसाहेबांबरोबर युद्धामध्ये सहभागी होऊन हाती तलवार घेऊन लढण्याचे स्वप्न रंगवून लष्करात सामील होण्याचा ठाम निश्चय तो करतो आणि आपल्या पिढीजात न्हाव्याच्या धोपटांसह, वस्तरा-वाटी घेऊन सैन्यातील बाजारबुणग्याच्या वेशात हाती ढाल-तलवार घेऊन; लढण्याचे ध्येय उराशी बाळगून सैन्याच्या ताफ्यात सामील होतो. शिवाय शिलेदाराच्या रूपात आपल्या राजकुमार नवऱयाला पाहणाऱया नववधूची परवानगीही त्याला मिळते. पानीपताच्या लढाईत भाऊसाहेबांबरोबर निकराची लढाई होते. उत्तरायणामुळे भाऊसाहेबांचे सैन्य सैरावैरा होते. रण सोडून ते पळ काढतात अशा धिरोदात्त क्षणी बाजारबुणगा असलेला मुकिंदा हाती तलवार घेऊन बेफाम तलवारबाजी करत लढतो. जिकडे-तिकडे नुसता रक्ताचा सडा पडतो. अशातच भाऊसाहेब दिसेनासे होतात व बाजारबुणगा असलेला मुकिंदा मग आपलं पारंपरिक न्हाव्याचं धोपटं पाठीवर घेऊन परतीच्या पवासाला निघतो. गिलच्यांचा पाठलाग चुकवत तो पंजाबात पोहचतो. तिथे धनगर त्याची मदत करतो.  प्रादेशिकतेच्या सीमा इथे गळून पडतात व देशहितास्तव दोघेही गहिवरतात. धनगर त्याची चुकलेली वाट सुधारून योग्य दिशादिग्दर्शन करून काही पैसे व उपयुक्त वस्तू देऊन त्याला घरच्या वाटेला रवाना करतो. परतीच्या प्रवासात त्याला भिल्लांचाही फटका बसतो. रानटी पशूवत जगणारे भिल्ल त्याच्या न्हावी असण्याचा फायदा करून  दाढी-मिशा करवून घेतात. या भिल्लाच्या वास्तव्यादरम्यान त्याच्यातील माणुसकीचा गंध भिल्लांनाही येतो. जंगलात राहणारे असले तरी त्यांनाही भावना आहेत. भिल्ल त्याला सन्मानाने व साभार आपल्या घराच्या दिशेने प्रस्थान करायला मदत करतात. व प्रवासात खर्चाची बेगमीही देतात.
या प्रवासात दोन वर्षे निघून जातात. मात्र मुकिंदा घरी परतत नाही तेव्हा मुकिंदा पानीपतात कामी आला, असं नाईलाजास्तव पार्वतीच्या आईवडिलांना व सासू-सासऱयाला मान्य करावं लागते. म्हातारे आईवडिल आणि तरूण बायको पार्वती मुकिंदाच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावूनबसलेले असतात. मात्र मुलीच्या बापाची चिंता त्याला स्वस्थ बसू देत नाही.मुकिंदा आपल्या गावापासून 10 कोस अंतरावर एका धर्मशाळेत थांबला असता एका शेतक-याची त्याची गाठ पडते. कधी एकदा आई-बाप व बायको पार्वतीला भेटतो असं त्याला होतं. मग तो शेतकरी पार्वतीच्या गावचाच पाहुणा निघतो व `पार्वतीचं म्होतूर लावलं गेलं' हे कळताच त्याच्यावर आभाळंच कोसळतं. `लढाईत जिंकलो परंतु घरी आल्यावर हरलो' म्हणून कोणत्या तोंडाने घरी जाऊ? हा प्रश्न त्याला पडतो. आणि मग तो गंगामुखाकडे प्रस्थान करतो. जेणेकरून आप्तांना कळावे मुकिंदा पानीपतातंच कामी आला. आपल्या आयुष्याची तिलांजली देऊन हा बाजारबुणगा माणुसकीचं कितीतरी मोठं देणं देऊन जातो.`ऐसे वर्तमान'या नाटकात लेखकाने सुप्त प्रेमकहानी बरोबरंच माणसाच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन स्वकर्तृत्वाचा डंका प्रसंगी दाखवून दिल्याचा ऐतिहासिक पुरावा प्रेक्षकांसमोर ठेवला. पारंपरिक धर्मव्यवस्थेची तटबंदी झुगारून माणसाच्या कर्तृत्वाचे निशाण मुकिंदा हा न्हाव्याचा पोर फडकवितो. हे पुरोगामित्वाचेच लक्षण लेखक बबन शिंदे बरोबर टिपतात. `मुकिंदा' हे पात्र नव्या दमाच्या प्रदीप सरवदे यांनी भूमिकेशी समरस होऊन साकारले आहे. `पार्वती' प्रतिक्षा अधिकारी हीनेही त्याची सक्षम साथ दिली आहे. म्हातारा-म्हातारीच्या भूमिकेत सुकेन पवार व विद्या जगे यांनी समर्पक व उचित अभिनयाची चुणूक दाखवून दिली. शिवाय नेपथ्याचा भडिमार, सोस न ठेवता केवळ सूचकात्मक घटना प्रसंगांना आविष्कृत करण्यात यशस्वी झालेले नाटकाचे दिग्दर्शक सुनील परब. त्यांच्या दिग्दर्शनाचे प्रायोगिकत्त्व आस्वादक-समीक्षकांनाही कौतूक करायला भाग पाडणारे ठरले. आणि ज्या धाटणीने ते वीररसोत्कटतेने ती गायकाने गायली त्याला तोड नाही. केवळ पोवाड्यातूनही पानीपताचा पट उलगडून रसिकांसमोर दृश्यरूपात साकार होण्याचे  सामर्थ्य त्यात आहे. वीरश्रीचा अनुभव व घटना-प्रसंगांचा पट उभारणे या दोघांच्याही कौशल्यामुळे आविष्कृत झाले आहे. कथानकाला चपखल दिसणारे हे पोवाडे काही अंशी गेयतेच्या मिटरमध्ये नसली व शाहीराच्या गायकीच्या कमी सरावाच्या जागा लक्षात येण्याजोग्या असल्या तरी सरावाने त्यात सराईतपणा निश्चितच येईल असा आशावाद. रसिकांना यावेळीही मिळून जातो. दिग्दर्शकाने या पोवाडे गाणाऱयांची कोप-यातील जागा एकंच एक न ठेवता मुक्त संचाररूपात ठेवल्यास ते अधिक परिणामकारक होईल. बबन शिंदेच्या या नाट्यसंहितेत काही अंशी पुनरूक्तीची सदोषता आहे. नाट्यवाचन करून तज्ञांच्या सूचना जाणून त्या काढल्यास नाटकाची उंची अधिक वाढेल व परिणामकारक होण्यास मदत होईल.वैचारिक नाटकांना गर्दी होत नाही, ही ओरड या `ऐसे वर्तमान' या नाटकाच्या एकंदर भूमिकेतून कायमची बंद होऊ शकेल, असा आशावाद व्यक्त करून पानीपताचा मुकिंदा आजच्या वर्तमानस्थितीतही तसाच उपेक्षित आहे. हे वास्तव या नाटकाच्या मुकिंदामुळे अनेक उपेक्षित, वंचित नायकांची कोंडी फोडण्याचे काम `ऐसे वर्तमान' नक्कीच करीत आहे. या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घ्यावे हीच या निमित्ताने शुभेच्छा.
प्रा. पद्माकर तामगाडगे




Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...