मास्तर... मास्तर..... समजूनच नाही राह्यलं पेरलं तेवढंय नायी उगवत लेकी-बायकोचंत सोडाच पण दोन येळंचं कसं भागन मास्तर तुम्हीच सांगा प्रॉब्लेम कोठी असंन? सालं वर्षानुवर्ष संकरीत बियाने दगा देऊन रायले आंब्याच्या झाडाले कावूनसन्या फनसं येऊन रायले आन बाभळीच्या झाडाले देखने फुलं येऊन रायले बापाच्या हातानं वावर फुलारलं होतं बाप गेल्यावर भावानं विदेशी एंड्रेल फवारली तवापासुनस काळी माय वांझोटी झाली रातदिस मशागत करून बापानं धम्माची टॉनिक पाजली होती तवा कणसं टरारून वर येत होती भावा-भावात हिशे-वाटणी झाल्यावर सुपीक माह्य अन कोरडं ठाण त्याचं? कायबी कळत नाय या फरकाचं रातच्याले माह्या पिकावर सोडते चराले अमेरिकन सांड आन डुर्कावते दोन्ही पायात हिल्गवून आंड मास्तर आता तुम्हीच सांगा कुठवर देऊ या वावरावर ध्यान का घेऊ दोऱ्यात अडकवून मान? तू एक कर..... रगारगात आंबेडकर पेर बघ कसं डौलदार पिक येईल मनूच्या भूमीला भडास दे ! बघ कसे क्षणार्धात ठीक होईल. - पद्माकर तामगाडगे